सातारा : साताऱ्यातील युवा गिर्यारोहिका धैर्या कुलकर्णी हिने हिमाचल प्रदेशातील ६,१११ मीटर (२०,०४९ फूट) उंचीचे युनाम शिखर यशस्वीपणे सर करून आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. अवघ्या १४ व्या वर्षी इतक्या उंचीचे आणि आव्हानात्मक शिखर पादाक्रांत केल्याने तिच्या नावावर एक उल्लेखनीय कामगिरी नोंदली गेली आहे.
मे महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या या मोहिमेत धैर्याला अत्यंत प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागला. कमी ऑक्सिजन, कडाक्याची थंडी, वेगवान वारे आणि खडतर चढाई अशा अनेक अडचणींवर मात करत तिने युनाम शिखर गाठले. पीर पंजाल पर्वतरांगेतील हे शिखर गिर्यारोहकांसाठी कठीण मोहिमांपैकी एक मानले जाते.
यापूर्वी धैर्याने हिमाचलमधील फ्रेंडशिप पीक मोहिमेतही प्रयत्न केला होता. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे शिखरापासून काही अंतरावर असताना तिला परतीचा निर्णय घ्यावा लागला. त्या अनुभवातून शिकत तिने अधिक तयारीसह युनाम मोहिम हाती घेतली आणि यश मिळवले.
धैर्याचा गिर्यारोहणातील प्रवास सातत्यपूर्ण मेहनतीचा आहे. वयाच्या बाराव्या वर्षी तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला. त्यानंतर आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमांजारो आणि युरोपमधील सर्वोच्च माऊंट एलब्रुस शिखरे सर करून तिने आपले कौशल्य सिद्ध केले. सह्याद्रीतील विविध गड-किल्ले आणि पर्वतरांगांमधील मोहिमाही तिने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक डॉ. हेमंत लिऊआ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. गेल्या सहा वर्षांपासून ती नियमित ट्रेकिंग व गिर्यारोहणाचा सराव करत असून प्रियांका मोहिते, कैलास बागल आणि डॉ. शीतल बेबी यांचेही तिला मार्गदर्शन लाभले आहे.
सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांची कन्या असलेली धैर्या सध्या नववीत शिक्षण घेत आहे. अल्पवयात गाठलेल्या या यशामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून ती अनेक तरुणांसाठी प्रेरणेचे प्रतीक बनली आहे.