अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबद्ध

ना. शिवेंद्रसिंहराजे; कारखाना कार्यस्थळावर रोलर पूजन उत्साहात

by Team Satara Today | published on : 04 August 2025


सातारा : ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्‍या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे. नेहमीप्रमाणे उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवत अजिंक्यतारा कारखाना होवू घातलेल्या हंगामात गाळपास येणार्‍या ऊसाला किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द आहे, असे आश्‍वासक प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ च्या गळीत हंगामाकरिता यंत्रसामुग्री देखभाल, दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील पहिल्या रोलर पूजन प्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कामगार-कर्मचारी उपस्थित होते.

होवू घातलेल्या गळीत हंगामात उच्चतम साखर उतारा व कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त साखरेचे उत्पादन घेणे तसेच उपपदार्थांच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक गाळप हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न करून १००% एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना वेळेत आदा केली जात आहे. गाळपास आलेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट वेळेत आदा केले असल्यामुळे ऊस उत्पादक, सभासद, बिगर सभासदांमध्ये अजिंक्यतारा कारखान्याबाबत समाधान असून अजिंक्यतारा परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. 

यावेळी जेष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, सर्जेराव सावंत, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल शिंदे, गणपतराव शिंदे, अजित साळुंखे, तानाजी जाधव, युनियन अध्यक्ष दिलीप शेडगे, ऊस तोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन चंद्रकांत घोरपडे, सातारा आणि जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कल्पनाचा मतृदेह आढळला गोंदी हद्दीत
पुढील बातमी
वाढदिवसाच्या दिनी फ्लेक्स लावू नका : सुशील दादा मोझर

संबंधित बातम्या