महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री

by Team Satara Today | published on : 26 October 2025


सातारा : फलटण येथील महिला डॉक्टरची आत्महत्या ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक असून यातील कोणालाही आम्ही सोडणार नाही. या घटनेत जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी फलटण येथे दिले. दरम्यान, शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नीरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याचा कामासह महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, माजी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, आमदार सचिन कांबळे–पाटील, राहुल कुल, महेश शिंदे, अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात बोलताना, परवा आमची एक लहान बहिण जी डॉक्टर होती, तिचा अतिशय दुर्देवीपणे मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या करताना त्याचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवले. या प्रकरणातील आरोपींना अटकही झाली आहे. त्यातील सर्व सत्य हे बाहेर येत आहे असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे अशा प्रकारचा निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. मी फलटणमध्ये येऊ नये यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. कोणत्याही गोष्टीत राजकारण करू नका. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक नेत्यांबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका असती तर मी नावाचा देवाभाऊ आहे. लगेच कार्यक्रम रद्द केला असता. या प्रकरणाची सत्यता लवकरच स्पष्ट होईल. महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी आम्ही कोणालाही सोडणार नाही. या घटनेत जो कोणी आरोपी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. विकास कामांच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुष्काळी भागासाठी निरा देवधर या प्रकल्पाचा पहिला आणि दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा होता. यापूर्वी सत्तेत असणाऱ्यांना हे स्वप्न कागदावर ठेवायचे होते. या प्रकल्पातील पाणी त्यांना दुसरीकडे न्यायचे होते. रणजितसिंह यांनी नीरा देवधरसाठी संघर्ष सुरू केला. आम्ही सर्वांनी मिळून केंद्र व राज्याच्या माध्यमातून त्या संदर्भातील सर्व अडचणी दूर केल्या. फडणवीस म्हणाले, शासनाने या परिसराला दुष्काळमुक्त करण्यासाठी नीरा देवघर कालव्याच्या कामातील अडचणी दूर करून कामाला सुरुवात केली आणि प्रकल्पाचे पाणी फलटण आणि माळशिरसला देणे शक्य करून दाखविले आहे. माणदेशातील साहित्य दुष्काळावर आधारित होते, हा दुष्काळ दूर करण्याचे काम शासनाने हाती घेतले असून सर्व कामे पूर्ण झाल्यावर हरित माणदेश तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पाडेगाव - साखरवाडी - जिंती - फलटण - शिंगणापूर रस्ता करण्यात येईल. माणगंगा नदीचा समावेश अमृत २ मध्ये करण्यात येईल आणि फलटण येथे न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येईल. फलटण येथील विमानतळाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येऊन काम शक्य असल्यास करण्यात येईल. फलटण येथील रुग्णालयातील सुविधा अद्ययावत करण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. फडणवीस पुढे म्हणाले, दुष्काळ दूर करणे, शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचे ध्येय असून शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. शेतकऱ्यांसाठी विजेचे बिल पाच वर्षासाठी माफ केले. भविष्यकाळात सोलरायझेशनच्या कामानंतर शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे याचा फायदा उपसा सिंचन योजनेला फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे. जोपर्यंत शेतीला पाणी आणि दुष्काळ पूर्णपणे दूर होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एक हुशार डॉक्टर भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी ठरली

संबंधित बातम्या