जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा (मल्हार) गडावरील त्रेलोकीचे शिवलिंग महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी पहाटेच्या सुमारास भाविकांना देवदर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावून मोठ्या उत्साही वातावरणात आणि भंडार खोबऱ्याच्या उधळनीत सदानंदाचा जयघोष करीत तीनही लोकांचे दर्शन घेतले. भंडारा खोबऱ्याची उधळन, सदानंदाचा येळकोट, हर -हर महादेव च्या गजराने मल्हारगड दुमदुमून गेला होता.
जेजुरीच्या खडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवांमध्ये महाशिवरात्रीउत्सवाला विशेष महत्व आहे महाशिवरात्रीचा प्रारंभ होताच मध्यरात्री १२ च्या सुमारास मुख्य मंदिराच्या कळसातील म्हणजेच स्वर्गलोकीचे शिवलिंग, तसेच मुख्य मंदिरामध्ये असलेले भूगर्भातील पाताळलोकीचे शिवलिंग आणि मंदिरामध्ये असलेले भूलोकीचे शिवलिंग खुले केले जाते. यातील मुख्यकळसातील शिवलिंग व भूगर्भातील शिवलिंग फक्त महाशिवरात्री दिवशीच खुली केली जातात वर्षभर ती बंद असतात.
सालाबाद प्रमाणे भाविक भक्तांसाठी श्री खंडोबा मंदिरात पहाटे महाशिवरात्री पूजेचे मानकरी (सोनवणे, वासकर, महाजन आदी) पुजारी सेवेकरी, विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांचे उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आली व त्रिलोक दर्शन पहाटे तीन वाजल्यापासून सुरू करण्यात आले असून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे आदी विश्वस्त उपस्थित होते.भाविक भक्तांसाठी सकाळी पासूनच खिचडी प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.सदरील खिचडी प्रसाद हा भाविक भक्तांसाठी दिवसभर चालू राहणार आहे.