कोरेगाव : शहरातील रहिमतपूर रस्त्यालगत औद्योगिक वसाहतीसमोर असलेल्या नगरपंचायतीच्या कचरा डेपोला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग असल्याने काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले. मात्र स्थानिक नागरिक, युवा कार्यकर्ते आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
आगीची माहिती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान परिसरातील नागरिक आणि युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर वडूज नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाने पाण्याचा जोरदार मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
रहिमतपूर रस्त्यावरील हा कचरा डेपो शहराच्या उंच भागात असून नगरपंचायतीच्या वतीने त्या परिसराला पत्र्याचे कुंपण घालण्यात आले आहे. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तसेच कचऱ्यामध्ये टाकण्यात आलेल्या ज्वलनशील वस्तूंमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही. नागरिक, युवा कार्यकर्ते, नगरपंचायत कर्मचारी आणि अग्निशामक दल यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.