महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या गुटखा व पान मसाला विक्रीवर अन्न-औषध प्रशासनाने कारवाई करून चार दुकानदारांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
बिलाल निजाम बेपारी (वय 47 रा.गवळी अळी, महाबळेश्वर) यांच्यासह मोहंमद रफी युसुफ मुलाणी (वय 65 रा. स्कूल मोहल्ला, महाबळेश्वर), मसीर मकबूल बेपारी (55, रा. गवळी मोहल्ला, महाबळेश्वर) व रिजवान रियाज मेमन (39, रा. महाबळेश्वर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, महाबळेश्वर व परिसरात अनेक छोट्या मोठ्या दुकानांसह रस्त्यावरील टपर्यांवर राजरोसपणे गुटखा व पान मसाला विक्री सुरू असल्याची माहिती अन्न-औषध प्रशासनाला मिळाली होती. सातारा येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी व औषध प्रशासन अधिकारी प्रियांका वाईकर यांनी अन्न-औषध प्रशासन व महाबळेश्वर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. यामध्ये मुख्य सुभाष चौकातील चार दुकानांमधून गुटखा, पानमसाला यांची विक्री केले जात असल्याचे निदर्शनास आले. या चार दुकानातून सुमारे 11 हजार 671 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.