पुणे : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. तर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली ते पाहून महाराष्ट्राच्या अंगावर काटा आला. त्यांच्या हत्येचे काही फोटोही समोर आले होते. ज्यामध्ये त्यांच्यासोबत किती अमानवीय वागणूक झाली हे दिसत होते. ते पाहून संपूर्ण राज्य हळहळलं होतं.
याप्रकरणी सध्या न्यायालयात खटला सुरु असून संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करत आहेत. भावाला न्याय मिळावा यासाठी ते आणि मस्साजोग ग्रामस्थ सरकारकडे मागणी करत आहेत. यादरम्यान आथा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमिरने देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.
पुण्यातील बालवाडी स्टेडियम येथे रविवारी (२३ मार्च) दुपारी पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम पार पडला. पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा लहान मुलगा विराजही उपस्थित होते. यावेळी अमिर खान आणि किरण राव यांनी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले.
यावेळी आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत त्यांची आणि कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी धनंजय देशमुखांचे डोळे पाणावले होते. आमिर खान यांनी खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर दिला. तसेच, विराज देशमुखला जवळ घेत कडकडून मिठी मारली. यावेळी आमिर खानच्या डोळ्यातही पाणी साठलेलं पाहायला मिळालं.