सातारा : सातारा शहरातील तहसील कार्यालयासमोर एकाला स्टेटस ठेवल्याच्या कारणातून मारहाण करण्यासाठी आलेल्या टोळक्याने राडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक महिला पोलीस व सातारा शहर पोलीस तेथे पोहचल्यानंतर टोळके पळून गेले. मात्र, त्यातील दोन अल्पवयीनांना पकडण्यात आले असून कोयता, कुकरी यासारखी धारदार हत्यारे त्यांच्याकडून जप्त केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन वाहतूक महिला पोलीस या पोवई नाका येथे कर्तव्य बजावत होत्या. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर युवकांचा मोठा जमाव जमला असून तेथे अनर्थ होणार असल्याची माहिती या महिला पोलिसांना मिळाली. या दोन्ही महिला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे काही युवक संशयास्पद हालचाली करताना आढळले. मात्र पोलिसांना पाहताच संशयित आरोपींची पळापळ झाली.
यावेळी माहिला पोलिसांनी मोठ्या शर्थीने संशयितांची धरपकड करण्यास सुरुवात केली. याचवेळी सातारा शहर पोलीसही दाखल झाले. परिसरात हाणामारी करण्यासाठी आलेल्या संशयितांची त्यांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. पोलिसांची संशयितांना पकडापकडीला सुरुवात झाल्यानंतर परिसरातील एका वाहनामध्ये शस्त्राचा साठा असल्याची माहिती वाहतूक महिला पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारमध्ये पोलिसांनी पाहणी केली असता कुकरी, कोयता यांसारखी धारदार हत्यारे होती. पोलिसांनी दोनजणांना पकडून हत्यारे ताब्यात घेतली. रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांकडे चौकशी सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार, जून्या वादातून हल्ला करण्यासाठी शस्त्रे घेऊन ही टोळी आली होती.