पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना अपात्र करण्यात यावे - सुशांत मोरे; स्वत:चे अतिक्रमण हटवून रस्ता रुंद करुन दाखवण्याचे आव्हान

by Team Satara Today | published on : 09 June 2026


सातारा  : नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची मिळकत रस्ता  रुंदीकरणात जात असताना त्यांनी जाणीवपूर्वक पदाचा गैरवापर करुन मिळकतीचे अतिक्रमण हटवून दिले नाही. तसेच स्वत:चे घर वाचवण्यासाठी अतिक्रमण मोहीम समर्थ मंदिर, बोगदा परिसरातच राबवण्यात आली. त्यामुळे पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली सातारा पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम चर्चेत आहे. अनेकजण अतिक्रमण हटावताना चेहरे बघून कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. समर्थ मंदिर, बोगदा परिसरातही काहींच्या संरक्षक भिंती तसेच बंगले हे तसेच ठेवले आहे. त्यातच ज्यांच्या हाती सातारा शहराचा कारभार आहे असे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनीच स्वत:चे अतिक्रमण काढून देण्यास प्रतिबंध केल्याचे स्पष्ट झाले आहे. श्री. मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, अमोल उदयसिंह मोहिते, रा. १६५, गुरुवार पेठ, सातारा हे अनेक वर्षे नगरसेवक तसेच विद्यमान नगराध्यक्ष आहेत. श्री. मोहिते यांनी २०२५ च्या सातारा  शहर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उमेदवारी नामनिर्देशनपत्रामध्ये राहण्याचा पत्ता १६५, गुरुवार पेठ, सातारा असा लिहिला असून तो बरोबर आहे. सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ५ मे २०२६ रोजी सार्वजनिक सूचना वर्तमानपत्रात प्रसिध्द केली होती त्यामधे त्यांनी सातारा नगरपरिषद इमारत ते बोगदा परीसर पर्यंत रस्ता हा सातारा शहराच्या पहिल्या सुधारीत विकास योजनेनुसार अस्तित्वातील रस्त्यास १५ मीटरचे रूंदीकरण प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. तसेच सद्यस्थतीत शासनाकडे मंजूरीकरता सादर असलेल्या दुसऱ्या सुधारीत विकास  योजनेमध्ये देखील या रस्त्यास १५ मीटरचे रूंदीकरण दर्शविण्यात आलेले आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना माहित आहे की, त्यांची मिळकत म्हणजेच पेठ गुरूवार सि. स.नं १६५ ही रस्ता रुंदीकरणात आहेत  अतिक्रमण आहे.

 तरी त्यांनी त्यांचे पदाचा गैरवापर करून सदरचे अतिक्रमण काढलेले नाही. नगराध्यक्ष मोहिते यांनी २१ मे २०२६ रोजी सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसमवेत अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली परंतु ही मोहीम माची पेठेपासून राबवली असती तर रस्ता रुंद झाला असता मात्र केवळ समर्थ मंदिर, बोगदा परिसरात कारवाई करण्यात आली. यात सुध्दा सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. माची पेठेतील स्वत:चे घर वाचावे म्हणून मुख्याधिकारी आणि नियोजन सभापती यांना हाताशी धरून ही मोहीम जाणूनबूजून समर्थ मंदिर, बोगदा परिसरात राबवण्यात आली.  श्री. मोहिते यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून अतिक्रमण काढण्यास अटकाव केल्याचे समजत आहे. अमोल मोहिते हे २०१६, २०२५ च्या सातारा शहर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगरसेवक, तर २०२५ मध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांची मिळकत ही सहहिस्साची असून मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेले आहे. हे कागदोपत्री पुराव्यासहीत स्पष्ट होत आहे.  सबब नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी  अधिनियम १९६५ चे कलम १६ व ४४ अन्वये नगराध्यक्ष म्हणून अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी श्री. मोरे यांनी केली आहे.  

अभ्यासू नगरसेवकांचा सल्ला घ्यावा

नगराध्यक्ष मोहिते यांच्यासमवेत अभ्यासू नगरसेवक आहेत त्यांचा सल्ला घेतला असता किंवा सहकार्य घेतले असते तर त्यांनी तुम्ही स्वत:च्या घरापासून सुरुवात करा असे सांगितले असते. अतिक्रमण मोहिम राबवताना स्वत:चे घर वाचवले असा संदेश जनतेमध्ये गेला नसता. अभ्यासू व्यक्तींना डावलून तुम्ही नगराध्यक्षपद मिळवले आहे मात्र त्यांचा अभ्यास कार्यक्षम आहेत  हे तुम्हाला आता पदोपदी जाणवले असेल त्यांच्याएवढे अभ्यासू होण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. नगराध्यक्ष पद भूषवणे हे कुणाचे खायचे काम नाही स्वतःचे चे नुकसान सोसून जनतेचे हित बघावे लागते तुम्ही उलट  वागत आहात स्वतःच हित बघताय आणि जनतेचे अहित करत आहात.

...तरच ते शूरवीर ठरतील

ही मोहीम राबवताना नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी खा. उदयनराजेंचे समर्थक असलेल्यांचे समर्थ मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवले त्याबद्दल समस्त सातारकरांच्यावतीने त्यांचे अभिनंदन परंतु ही मोहीम राबवताना नगराध्यक्ष मोहिते यांच्या घरापासून रस्ता रुंदीकरण सुरु केले असते तर ते खरे शूरवीर ठरले असते. जेव्हा ते नगराध्यक्षांचे अतिक्रमण काढतील तेव्हा ते खरे शूरवीर ठरतील. मुख्याधिकारी जळक हे सुध्दा कर्तबगार प्रशासकीय अधिकारी आहेत. जनतेचे अतिक्रमण पाडताना कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही त्याचप्रमाणे नगराध्यक्षांचेही अतिक्रमण पाडण्याचे धाडस दाखवावे अन्यथा त्यांनी आता केलेली कामगिरी हे 'विनोदा' सारखीच ठरेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जोशीविहीरनजीक हॉटेल रायगड इन समोर कारने ठोकरल्याने रस्ता ओलांडणारा पादचारी जागीच ठार
पुढील बातमी
तर माझाच पहिला नंबर असेल - नगराध्यक्ष अमोल मोहिते; सुशांत मोरे यांच्या तक्रारीला प्रत्युत्तर; दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच

संबंधित बातम्या