फलटण : फलटणमध्ये नगरपालिका निवडणुकीचा धुरळा खाली बसताच आज सकाळी ईडीचे म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे पथक दाखल झाले असून फलटणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयाची झाडाझडती सुरू केल्यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
फलटण आणि कराड येथील यशवंत बँक शाखेत ११२ कोटी १० लाख ४८१ कृपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ३६ संचालक व तीन कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकांवर जणांवर कराड पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.१ एप्रिल २०१४ ते २०२५ या अकरा वर्षाच्या कालावधीत झालेल्या लेखापरीक्षण आणि १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०२४ या लेखापरीक्षण पूर्व कालावधीत कार्यरत असलेल्यांवर पुण्याचे शासकीय लेखापाल मंदा देशपांडे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. मात्र पोलिसांनी याप्रकरणी एमपीडी ॲक्ट सारखे कलम संबंधितांवर लावले नव्हते. तसेच त्यांना अटकही केली नव्हती. किरकोळ फसवणुकीचे प्रकार झाले तरी पोलीस त्याची गंभीर्याने दखल घेतात या प्रकरणात मात्र पोलिसांनी बोटचेची भूमिका घेतल्यामुळे जिल्ह्यातून आश्चर्य व्यक्त होत होते.
बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून वकिलांच्या माध्यमातून न्यायालयाकडे मागणी केली होती. ३६ पैकी सहा जणांना न्यायालयाने तात्पुरता जामीन दिला होता. इतर कोणत्याही संशयिताच्या जामिनावर सुनावणीच झाली नव्हती. यशवंत बँकेच्या गैर व्यवहारात सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे पदाधिकारी शेखर तळेगावकर यांच्यासह ५० जण संशयित आहेत मात्र त्या सर्वांना भाजपचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती.
बोगस कर्ज प्रकरणे व बनावट कागदपत्रांचा वापर
यशवंत बँकेच्या माध्यमातून बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली. तसेच खोटी व बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. तारण न घेता हेतुपरस्पर कर्ज वाटप करण्यात आले असून जुनी थकीत खाते बंद दाखवून नवीन खाते उघडण्यात आली. निधीचा उद्देश बाह्य वापर करून तो तृतीय पक्षांकडे वळवण्यात आला तसेच दस्तऐवजात फेरफार व खोट्या नोंदी करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला होता. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर आज पहाटे ईडीचे पथक फलटणमध्ये दाखल झाले. संबंधित पथकाने बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी कारवाई सुरू केली त्यानंतर थेट यशवंत बँकेच्या मुख्यालयात पथकातील अधिकारी दाखल झाले. सकाळी बँकेचे कामकाज सुरू होतात सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक नोंदी, कर्ज प्रकरणांशी संबंधित फाईल्स व डिजिटल रेकॉर्डची कसून तपासणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. या कारवाईदरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.