सातारा : गणेशोत्सवात होणाऱ्या डीजे, डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे आणि लेझर लाईटमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी यावर कडक निर्बंध घालावेत, या मागणीसाठी सातारा येथील गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला तरी गेल्या काही वर्षांत डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. या तीव्र आवाजामुळे आणि घातक लेझर किरणांमुळे लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि गंभीर आजारी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आवाजामुळे दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर गंभीर परिणाम होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार रात्री दहा नंतर ध्वनिक्षेपकावर बंदी असतानाही त्याचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे उत्सवात डीजे आणि डॉल्बीवर पूर्णपणे बंदी घालून ध्वनिक्षेपकासाठी विहित डेसिबल मर्यादेचे काटेकोर पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक दंडात्मक कारवाई करावी आणि पारंपरिक ढोल-ताशा, झांज पथकांना प्रोत्साहन देत संस्कृतीला धरून उत्सव साजरा करण्याबाबत प्रबोधन करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
मिरवणुकीतील प्रचंड आवाज आणि डोळ्यांवर पडणाऱ्या लेझर लाईटमुळे लहान मुले व महिलांना होणाऱ्या त्रासाकडेही विद्यार्थ्यांनी यावेळी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे कौतुक करत अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी निवेदनावर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य असून असा विधायक विचार समाजाला योग्य दिशा देणारा ठरतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी गुरुकुल स्कूलचे इयत्ता नववीचे विद्यार्थी उपस्थित होते.
गणेशोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी घाला; गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
by Team Satara Today | published on : 03 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा