सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी रात्री कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रत्यक्ष रिक्षाचं स्टिअरिंग हातात घेतलं आणि काही अंतर स्वत: रिक्षा चालवली. ही अनोखी झलक पाहण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांची गर्दी केली होती.
एका कार्यक्रमानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने रिक्षामधून येताना विनोदाने ''राजे, तुम्हीच थोडं रिक्षा चालवा!'' असा आग्रह धरला. त्यावर हसत-हसत शिवेंद्रसिंहराजेंनी रिक्षाचं स्टिअरिंग हातात घेतलं आणि काही क्षणातच रिक्षा रस्त्यावर पुढे नेली. काही क्षणातच त्या दृश्याने वातावरणात उत्साह निर्माण झाला. नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यातून तो प्रसंग टिपला, तर सोशल मीडियावरही या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री म्हणून कार्यरत असतानाही शिवेंद्रसिंहराजे भोसले नेहमीच जमिनीवरचे आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे म्हणून ओळखले जातात. या घटनेने पुन्हा एकदा त्यांची सहज, विनोदी आणि लोकाभिमुख शैली अधोरेखित झाली.
रिक्षा चालवताना त्यांनी चालकांशी संवाद साधला आणि त्यांच्या दैनंदिन अडचणींबाबतही विचारपूस केली. ''रिक्षाचालक हे शहराच्या वाहतुकीचे खरे साथीदार आहेत,'' असेही त्यांनी सांगितले. ''राजे नेहमीच आमच्यासोबत राहतात. आज त्यांनी रिक्षा चालवली, पण आमच्यासाठी ते नेहमीच मार्गदर्शक चालकासारखे आहेत,''असं एक कार्यकर्ता हसत म्हणाला.
या अनोख्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर विनोदी आणि कौतुकाचे प्रतिसाद दिले आहेत. ''मंत्री रिक्षाचालक बनले, पण चेहऱ्यावरचा राजेशाही आत्मविश्वास तसाच!'' असा एक कमेंट व्हायरल झाला आहे.