सातारा : सातारा शहरातील मोबाईल चोरीचे प्रकरण शाहूपुरी पोलिसांनी उलगडले आहे. राधिका रोड ते एसटी स्टँड परिसरात पेट्रोलिंग करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका वाहनातील पाच जणांना पकडून त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी बारा मोबाईल चोरल्याचे कबूल केले.
या कारवाईत गेल्या तीन दिवसात सातारा शहर भाजी मंडई, सदाशिव पेठ जुना मोटर स्टॅन्ड येथून चोरी गेलेले 12 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. हा मुद्देमाल तब्बल दहा लाख 258 रुपयाचा आहे. याप्रकरणी जगदीश रामप्रसाद महतो, अजित कुमार सुरेश मंडळ वय 24, रोहित कुमार सियाराम महतो वय 25, अर्जुन राजेश मंडल वय 20 सर्वजण राहणार महाराजपूर सहाबगंज राज्य झारखंड, शोएब मस्तान साहेब शेख वय 24 राहणार सलगरपुरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड आणि एक विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सातारा शहरामध्ये मोबाईल चोरीच्या घटना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अचानक वाढल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचित केले होते. म्हेत्रे यांनी शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे, पोलीस अंमलदार पथकाला याप्रकरणी पाचारण केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक राधिका रोड येथे पेट्रोलिंग करत असताना एक संशयित वाहन वेगाने जाताना त्यांना दिसले. पोलिसांनी गाडी अडवून संशयीतांना नाव विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये 12 मोबाईल आढळून आले. हे मोबाईल त्यांनी सातारा शहरातून चोरल्याचे कबूल केले.
या कारवाईमध्ये हवालदार सुरेश घोडके, मनोज मदने, ज्योतीराम पवार, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल चव्हाण, स्वप्निल पवार, सुमित गोरे, संग्राम फडतरे, जयवंत घोरपडे, महिला पोलीस अंमलदार कोमल पवार यांनी भाग घेतला.