पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे जखिणवाडीच्या युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार, पथके संशयीतांच्या शोधासाठी रवाना

by Team Satara Today | published on : 25 October 2025


कराड  : कराड तालुक्यातील नांदलापूर येथे सुमारे ६ महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ५ जणांनी २६ वर्षीय युवकाचा तलवार व कोयत्याने वार करत खून केला. शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण बोडरे ((रा. जखिणवाडी ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जखीणवाडी येथील युवकांमध्ये मागील ६ महिन्यांपूर्वी गावच्या यात्रेत राडा झाला होता. त्याचा राग मनात धरून शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोळक्याने नांदलापूर गावच्या हद्दीत संगणमत करून प्रवीण बोडरे याच्यावर तलवार व कोयत्या सारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. त्याच्या डोक्यावर, हातावर व मांडीवर हे वर्मी घाव करण्यात आले. या हल्ल्यात तो युवक गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. जखमीला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. मात्र त्याच्यावर गंभीर वार झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके संशयीतांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांनी युवकाचा मृतदेह रात्री उशिरा उत्तरणीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला असून रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली नव्हती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगरात स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
‘महाराष्ट्राचे‘मिनी काश्मीर’ तापोळा पर्यटकांनी गजबजले; तापोळा सध्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण

संबंधित बातम्या