सातारा : मानवतेचा लढा जात आणि धर्माच्या पलिकडे गेल्याशिवाय व्यापक अर्थाने यशस्वी करता येणार नाही. त्यासाठी भावनिकता गाढून बुध्दिसामर्थ्याच्या जोरावर युगनायकांची विचार चळवळ पेलून धरायला हवी. चळवळ पेलून धरण्याची जबाबदारी जेवढी सामान्य कार्यकर्त्यांची आहे तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक बुध्दीजीवी समूहाची आहे, असे प्रतिपादन पहिले युगनायकांचे विचार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. विलास खंडाईत यांनी केले.
भीमाईभूमी - सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत महाराष्ट्र विचार साहित्य संसदेच्या वतीने आयोजित केलेल्या पहिले युगनायकांचे विचार साहित्य संमेलन दिमाखात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणा दरम्यान सहाय्य समाजकल्याण आयुक्त सुनील जाधव, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी या संमेलनाचे उदघाटन डॉ. शरद गायकवाड यांनी केले. स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाची जबाबदारी साहित्यिक अरुण जावळे यांनी सक्षमपणे पेलली.
विचारवंत, ज्ञानवंत असलंच पाहिजे परंतु वर्तनव्यवहारही कृतीशील असला पाहिजे असे सांगत राजकीय, सामाजिक अन् सांस्कृतिक गुलागिरीतून बाहेर येऊन नवा मार्ग चोखाळण्याची धमक दाखवायला हवी. त्याचबरोबर सर्व जातसमूहातील युवकांना त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उत्थानात युगनायकांच्या विचारांचे काय योगदान राहिले हे पटवून द्यावे लागेल. त्याशिवाय आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी राजकारण समृध्द आणि सशक्त होणार नाही असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. विलास खंडाईत यांनी मांडले. उदघाटकीय भाषणात डॉ. शरद गायकवाड यांनी सर्व प्रकारचा दहशतवाद पुढे येत असताना आपण सर्वांनी अत्यंत चिकित्सकपणे महापुरुषांचा विचारवारसा तेवत ठेवायला हवा, असे सांगितले. दि. बुध्दिस्ट सोसायटी आॕफ इंडियाचे राष्ट्रीय ट्रस्टी अरुण पोळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष अरुण जावळे यांनी संमेलनाच्या संदर्भातील भूमिका विषद केली.
'नव्या पिढिच्या परिप्रेक्ष्यातून आंबेडकरी विचार आणि मानवाधिकारांचे संरक्षण' या विषय सत्रात शिवाजी विद्यापीठाचे उपकूलसचीव डॉ. अलोक जत्राटकर यांनी मांडणी केली. डॉ. मृणालीनी आहेर यांनी या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले. ' आंबेडकरी चळवळ काल आज उद्या' या विषयावर प्रा. डॉ. केशव पवार आणि शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे सहाय्यक संचालक प्रा. अविनाश भाले यांनी विवेचन केले. 'संवाद कवितेचा' यामध्ये डॉ. एस. पी. कांबळे, शाहीर श्रीरंग रणदिवे, ॲड. हौसेराव धुमाळ, अशोक भालेराव यांचा सहभाग होता.
समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव आणि प्रशांत पोतदार यांनी नव्या पिढ्यांना दिशा देण्यासाठी युगनायकांचे विचार आणि साहित्य किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या भाषणातून अधोरेखित केले. या संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन नारायण जावलीकर, विलासराव कांबळे यांनी केले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी योगेश म्हस्के, रमेश म्हस्के, जालिंदर म्हस्के, समता सैनिक दलाचे कमांडर यशपाल बनसोडे, मुकुंद गायकवाड, सुरेंद्र म्हेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगिताने संमेलनाची सांगता झाली.