कराड : शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून शुक्रवारी डांबरीकरणाचे काम सुरू होते. हे डांबरीकरणाचे काम सुरु असताना भाजी मंडई परिसरात डांबराचा टँकर पेटल्याची घटना घडली. वेळीच नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, कराड शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. शुक्रवार (दि.25) रोजी सायंकाळी शहरातील भाजी मंडई परिसरात अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना डांबराच्या टँकरने अचानक पेट घेतला. भाजी मंडईतील भर नागरीवस्तीत रस्त्याचे काम सुरू असताना टॅंकरने पेट घेतलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागात कचऱ्याचे साम्राज्य असून, टँकरच्या आगीमुळे लगतच्या कचऱ्याने पेट घेतला.
अचानक लागलेल्या या आगीमुळे घबराट पसरली होती. त्यात कचऱ्याचे साम्राज्य रस्त्यात असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात भडकली असती. मात्र, परिसरातील नागरिकांनी वेळीच सतर्कता दर्शवत सदरची आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु, नगरपालिका प्रशासनाने नागरीवस्तीत अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण व अन्य काम करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आगीच्या अनेक घटना उघडकीस
राज्यातील वेगवेगळ्या भागातून आगीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच पुण्यात रस्त्याने धावणाऱ्या कारला अचानक आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या आगीत कार जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना दापोडी चौक येथील अशोका हॉटेलसमोर घडली होती. त्यानंतर आता कराडमध्ये नागरीवस्तीतच डांबराचा टँकर पेटल्याचे समोर आले आहे.