सातारा : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, याला शासनाच्या अपुऱ्या धोरणांची जबाबदारी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केला. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, तसेच ऊस व इतर शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी आपण जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत असून, उसाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णायक लढे दिले आहेत. “आम्ही उसाचे दर वाढवून दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांनी आमची ताकद ओळखून आम्हाला योग्य किंमत दिली पाहिजे. ज्या वेळी आमची ताकद वाढेल, त्याच वेळी शेतीमालाच्या दरात वाढ होईल,” असे शेळके म्हणाले.यावेळी त्यांनी केवळ विकासाच्या भुलथापांवर टीका करत, अशा आश्वासनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात कोणताही ठोस बदल होणार नसल्याचे सांगितले. उसाच्या दरवाढीसह शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानीला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्या राजकीय पक्षांना खरोखरच शेतकऱ्यांचा कळवळा आहे, त्यांनी या लढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
दरम्यान, शिवतीर्थावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.