सातारा : सातारा जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. पीडित महिलांच्या तक्रारी दाखल करून घेण्याकरता महिला पोलीस अधिकार्यांच्या नियंत्रणात असलेल्या भरोसा सेल इमारतीचे कामकाज येत्या महिनाभरात पूर्ण होईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापुढे एखाद्या मुलीची छेड काढणारा मुलगा तिसर्यांदा सापडला तर त्याची थेट धिंड काढण्याचा परखड आदेश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, आश्रम शाळा, बालगृह, महिला वसतिगृह, अनाथ आश्रम, खाजगी क्लासेस सर्व ठिकाणी शिकण्यास व वास्तव्यास असणार्या मुली व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकार्यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी सातारा येथे सर्व यंत्रणांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये त्यांनी काही परखड आदेश दिले. यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य राहील. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. शाळांनी तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी सर्व शाळांमध्ये फिरून त्या ठिकाणची सीसीटीव्ही यंत्रणा सक्रिय आहे की नाही याचा अहवाल तत्काळ आठ दिवसात पाठवावा, महिला व पुरुष स्वच्छतागृहे जवळजवळ असल्यास त्या ठिकाणी पार्टिशन करून दोन्ही ठिकाणचे प्रवेश स्वतंत्र ठेवावेत तसेच कंत्राटी तत्त्वावरचे सफाई कामगार ठेवायचे असल्यास त्यांची पोलीस चरित्र पडताळणी करणे अपरिहार्य असेल, असे आदेश देसाई यांनी दिले. मुली, महिला, पालकांकडे महिला पोलिसांचे संपर्क क्रमांक देण्यात यावेत आणि ते संपर्क क्रमांक शाळांनी ठराविक ठिकाणी प्रदर्शित करावेत. जिल्ह्यातील पीडित महिलांसाठी स्वतंत्र भरोसा विभाग असेल. भिक्षेकरी गृहाच्या परिसरामध्ये हा विभाग उभा केले जाणार असून त्याकरता जिल्हा नियोजन समितीतून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे भरोसा सेल संपूर्ण महिला पोलीस अधिकार्यांच्या नियंत्रणात असणार आहे. जेणेकरून महिलांना तक्रार दाखल करताना कोणताही संकोच होणार नाही. सातारा जिल्ह्यातील एसटी, वडाप, रिक्षा या ठिकाणी स्वतंत्र किंवा क्यूआर कोड दिला जाणार आहे. छेडछाड होत असल्याचा जराही संशय आला तर तो क्यूआर कोड महिलांनी स्कॅन करावा. जेणेकरून परिसरातील नजीकच्या पोलीस स्टेशन मधून मदत उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाची आकडेवारी सादर केली. 2021 पर्यंत 3819 तर गेल्या तीन वर्षात 27 हजार 629 महिला सुरक्षिततेच्या संदर्भाने कारवाया केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील सादरीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. एखादा टवाळखोर छेडछाड करताना तिसर्यांदा सापडला तर पोलिसांनी त्याची थेट धिंड काढावी, असे स्पष्ट आदेश शंभूराज यांनी दिले. नोंदणीकृत अनाथ आश्रम, होस्टेल, वृद्धाश्रम यांचा यंत्रणांनी तात्काळ आढावा घ्यावा. ज्यांच्या नोंदणी नसतील असे आश्रम तात्काळ सील करण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश देसाई यांनी दिले.
महागाव, ता. सातारा याठिकाणी उभारण्यात येणार्या नव्या कारागृहाबाबत माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता देसाई म्हणाले, या जमिनीच्या हस्तांतराची प्रक्रिया सुरु आहे. मी गृहराज्यमंत्री असताना दिलेला तो शब्द आहे आणि मी शिंदे गटाचा मंत्री असल्याने मी माझा शब्द पूर्ण करणारच.
पीडित महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र भरोसा सेल
डीपीसीतून स्वतंत्र इमारतीसाठी 50 लाखाची तरतूद; महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
by Team Satara Today | published on : 23 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा