स्मृतीदिन हा केवळ दुःख व्यक्त करण्याचा क्षण नसून जीवनमूल्यांचे चिंतन करण्याचा दिवस : पूज्य भंते काश्यप

by Team Satara Today | published on : 22 September 2025


फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे धम्म सेवक संजय प्रल्हाद घोरपडे यांच्या वतीने मौजे सासकल येथे त्यांच्या आई कालकथित बायनाबाई प्रल्हाद घोरपडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आईच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे बौद्धाचार्य म्हणून केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांनी संपूर्ण विधी बौद्ध पद्धतीने संपन्न केला. प्रसंगी पूज्य भंते काश्यप यांनी धम्मदेशना करताना अष्टांगिक मार्गातील सम्यक दृष्टी व सम्यक वाचा या दोन महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ‘कालकथित’ या संकल्पनेचा अर्थ व त्याचे विश्लेषण करत समाजबांधवांना प्रबोधन दिले.

‘कालकथित’ संकल्पनेचा अर्थ व महत्त्व यावर धम्मदेशना करताना भंते काश्यप यांनी ‘कालकथित’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले, बौद्ध धम्मात कालकथित म्हणजे या नश्वर जगातून प्रवास संपवून अनित्यतेची जाणीव करून देणारी अवस्था. मानवी जीवन क्षणभंगुर असून प्रत्येक जीवाला मृत्यू अनिवार्य आहे. या अनित्यत्वाची जाणीव करून देऊन कालकथित व्यक्ती समाजात स्मरणार्ह ठरते. मृत्यू म्हणजे अंत नव्हे तर धम्माच्या अनुसंधानाने केलेल्या कार्यांचे स्मरण करण्याची संधी असते, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यामुळे स्मृतीदिन हा केवळ दुःख व्यक्त करण्याचा क्षण नसून जीवनमूल्यांचे चिंतन करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आईच्या महतीवर गीतातून प्रबोधन -

फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव यांनी आईच्या महतीवर आधारित गीत सादर केले. या गीतातून आईची नि:स्वार्थ सेवा, त्याग आणि ममत्व यांचे दर्शन घडवून उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

या स्मृतीदिन कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्ह्याचे संघटक माजी अध्यक्ष आयु. श्रीमंत घोरपडे, महासचिव फलटण तालुका आयु. बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे, कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते, फलटण तालुक्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व आयु. सोमीनाथ घोरपडे, संघटक आयु. आनंद जगताप तसेच सासकल गावातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता आईच्या स्मृतीला आदरांजली वाहून करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांनी बायनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाला व आईच्या आदर्शरूपाला वंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
औंधला आजपासून नवरात्रोत्‍सव

संबंधित बातम्या