फलटण : “न्याय देण्यास उशीर होणे हा आपल्या व्यवस्थेवरील काळा डाग असून तो पुसून काढणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी केले.
फलटणच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे उद्घाटन कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, न्यायमूर्ती राजेश पाटील, ए. एन. पानसरे, नितीन बोरकर, एस. पी. सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “आज माहेरी आल्याचा आनंद आहे,” असे सांगत आपल्या साताराशी असलेल्या नात्याची आठवण करून दिली. “न्याय देण्यास उशीर होणे हा आपल्या व्यवस्थेवरील काळा डाग आहे. तो पुसून काढणे आपले कर्तव्य आहे. कोर्ट हे साहेबांना सॅल्युट मारण्यासाठी नसते; ते पक्षकारांसाठी असते,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी हा अन्नदाता असून त्याला न्याय देणे ही पवित्र जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे संचालक कोंडे देशमुख व भोसले यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजुरी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
फलटण वकील संघाचे अध्यक्ष एन. एम. जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात “फलटण ते सातारा हे ७० ते ८० किलोमीटर अंतर पार करताना अनेक वकील आणि पक्षकारांना अपघातांचा सामना करावा लागला. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास हा नित्याचा झाला होता. आज हे न्यायालय सुरू झाल्याने फलटणकरांचा मोठा भार हलका झाला असल्याचे नमूद करून
ते पुढे म्हणाले, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार झाले. आता न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल. मात्र फलटणमधील सर्व न्यायालये एकाच प्रशस्त इमारतीत असावीत, ही आमची अपेक्षा आहे. धर्मादाय कार्यालय व सहकार न्यायालयही येथे सुरू झाले पाहिजे; तेव्हाच जिल्हा निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.”
जिल्हा प्रमुख न्यायाधीश वाघमारे यांनी सांगितले की, “न्यायालय मंजूर झाल्यानंतर आमच्या न्यायाधीश, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन दिवसांत तब्बल २०४५ प्रकरणे साताऱ्यावरून फलटण येथे वर्ग केली. ही मोठी प्रशासकीय कामगिरी आहे.”
त्यांनी नमूद केले की, न्यायालयात ई-सुविधा व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपलब्ध असून उद्यापासून प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. “फलटणच्या वकिलांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे. आता फलटणकरांना फलटणमध्येच न्याय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फलटणच्या न्यायालयाच्या उद्घाटनासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती उपस्थित राहणे ही अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी प्रथमच फलटणला येत असल्याचे सांगत येथील जनतेचे कौतुक केले. “फलटण हे विशेष ठिकाण आहे. येथे जिल्हा न्यायाधीश आधी आणि सीनियर डिव्हिजन नंतर आले, ही वेगळी बाब आहे. वकिलांनी पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे,” असे त्यांनी आवाहन केले.
न्यायमूर्ती ए. एन. पानसरे यांनी फलटणशी असलेले आत्मीय नाते व्यक्त करत “आमची माती, आमची माणसं” असे शब्द उच्चारले. बालपण फलटणमध्ये गेले असल्याचे सांगत त्यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाची आठवण सांगितली. “सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी पक्षकार व साक्षीदारांना कम्फर्टेबल केले पाहिजे. केसेस जलदगतीने निकाली काढणे हीच खरी सेवा आहे,” असे ते म्हणाले.
न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी सांगितले की, “जिल्हा न्यायालय फार लांब असणे न्यायदानासाठी योग्य नाही. पक्षकार व साक्षीदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आज फलटणमध्ये कोर्टाची साखळी पूर्ण झाली आहे.”
ते पुढे म्हणाले, “सर्व न्यायालयांत ३० ते ४० वर्षांची प्रकरणे प्रलंबित आहेत. जसे न्यायाधीशांना नियम आहेत तसेच वकिलांनाही असले पाहिजेत. जिथे गरज असेल तिथे नियमांचा काटेकोर वापर झाला पाहिजे. आज उद्घाटन करत असलेले हे कोर्ट कधीही बंद होऊ नये.”
फलटणचे पहिले दिवाणी न्यायाधीश एस. पी. सय्यद यांनी मार्गदर्शनाबद्दल सर्व न्यायमूर्तींचे आभार मानत, “जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून न्यायदान जलद गतीने करण्याचा अथक प्रयत्न करणार,” अशी ग्वाही दिली.