सातारा : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एका गावात आज रविवारी सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समजताच सातारा- जावली तालुक्यात भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने पठार भागात गस्त घालण्यासह अलर्ट राहण्याची मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळी जवळ असणाऱ्या भेंडवडे गावात आज सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निनू यशवंत कंक (वय ७५) आणि त्यांची पत्नी रखूबाई निनू कंक (वय ७०) या वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समाज माध्यमातून सातारा तालुक्यातील पठार भागात समजतात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला परिसरासह सातारा तालुक्यातील बोर्णे घाट ते जांभे पठार आणि जावली तालुक्यातील कास पठार परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो. त्यामध्ये विशेष करून बिबट्याचा समावेश मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील पठार भागातील शेळ्या- मेंढ्या यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्या फस्त केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. चाळकेवाडी पठार परिसरात काही गायी, यांच्यावरही बिबट्याने काही वर्षापूर्वी हल्ला केला होता. सातारा आणि जावली तालुक्यातील पठार भागात बिबट्यांचा मुक्त संचार असल्याच्या अनेक खाणाखुणा वन्यप्रेमींसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही पाहायला मिळाल्या होत्या.
सातारा तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांवर हल्ला केला त्या त्या ठिकाणी वन विभागाने तत्परतेने वेळोवेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते मात्र प्रत्येक वेळी बिबट्याने पिंजऱ्याला हुलकावण्या दिल्या होत्या.
दोन दिवसांवर दिवाळी आल्यामुळे पुणे- मुंबई येथे नोकरी करणारे स्थानिक आपल्या कुटुंबासह सातारा- जावली तालुक्यातील पठार भागातील नागरिक आपल्या गावी कुटुंबासह दाखल झाले आहेत. शाहूवाडी तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाल्याची बातमी समजतात त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही तालुक्यातील पठार भागात ग्रस्त घालून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निमित्ताने होत आहे.