बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयिताचा एन्काऊंटर

आरोपीच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी जखमी; विरोधकांकडून सरकार धारेवर

by Team Satara Today | published on : 23 September 2024


मुंबई : बदलापूर (ठाणे) येथे 20 ऑगस्ट रोजी एका नामांकित खाजगी शाळेमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरात तसेच बदलापूरमध्ये नागरिकांनी उग्र आंदोलन केले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या मुसक्या आवळल्या होत्या. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज दि. 23 रोजी तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला पोलीस घेवून जात असतानाच त्याने पोलिसाच्या कंबरेची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. दरम्यान, या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून या एन्काऊंटर प्रकरणी विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. 
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आल्याची बातमी काही वृत्तमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काऊंटर बाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ''महाराष्ट्र पोलिसांची एक प्रतिमा होती. सक्षम आणि कार्यसक्षम यंत्रणा म्हणून पोलिसांची ओळख होती. पोलीस ठाण्यात माणूस मरतो मग त्याचा खून केला का? त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कायदा सुव्यवस्थेवर कुणाचे नियंत्रण राहिले नाही. गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, ''हैद्राबादच्या बलात्कार प्रकरणात 4 आरोपींचा अशाच प्रकारे एन्काऊंटर करण्यात आला होता. तसच अक्षय शिंदे प्रकरणात घडलं आहे. पोलिसांकडून स्वरक्षणासाठी बनाव केला. त्यांनी केलेला स्वरक्षणाचा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. अक्षय शिंदे हिंस्र होता का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, '' पोलिसांचे काय चाललं आहे? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. प्रकरण पुढे जाऊ नये म्हणून घडवून आला का? याची पुन्हा चौकशी करावी लागेल. एखाद्या आरोपीच्या हाताशी पोलिसांची बंदूक लागणे हे अत्यंत चुकीचे आहे.
दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय तपासणी सुरु असताना डॉक्टरांसमोर आपला गुन्ह्यातील सहभाग कबूल केला होता. अशातच आता मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला असल्याची माहिती समोर आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डंपरची चोरी
पुढील बातमी
महाराणी येसूबाई स्फूर्तीस्थळासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना साकडे

संबंधित बातम्या