पुरोगामी विचारांच्या परिवारातून आलेल्या नेत्यांकडूनच जिल्ह्यात दहशतीचे राजकारण - आमदार रोहित पवार, सत्तेचा गैरवापर करून पैसा, दबाव आणि दडपशाहीचा वापर केला जात असल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 23 August 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी सत्तेचा, पैशांचा आणि दबावाचा वापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. पुरोगामी विचारांच्या परिवारातून आलेल्या नेत्यांकडूनच भाजपच्‍या नादी लागून दहशतीचे राजकारण होत असल्याचे पाहून अधिक वाईट वाटते, अशी टीका त्यांनी माध्‍यमांशी बोलताना केली.

आ. पवार म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदार असतात. सत्तेत असलेले नेते, मंत्री सत्तेचा फायदा घेत पैसा आणि गुंडांचा वापर करून ठराव आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपची सवय लागलेल्या आणि पुरोगामी विचारांच्या परिवारातून आलेल्या नेत्यांनी ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी दहशत निर्माण केली आहे, अशी टीका त्यांनी केली. मित्रपक्षातील ना. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यालाही पोलिसांकडून ढकलाढकली करण्यात आली. सत्तेचा आणि दडपशाहीचा हा प्रकार असल्याचेही आ. पवार म्हणाले.

सत्तेचा गैरवापर करून पैसा, दबाव आणि दडपशाहीचा वापर

जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या आघाडीच्या माध्यमातून लढली जात होती; मात्र आता भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करत आहे. यावर बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, भाजपकडे पैसा आल्यामुळे सत्तेचा गैरवापर करून पैसा, दबाव आणि दडपशाहीचा वापर केला जात आहे. सोसायट्यांचे ठराव करतानाही हा प्रकार करण्यात आला. सत्तेचा गैरवापर करणे योग्य नाही. भाजपच्या नेत्यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांच्या विरोधातही पोलिसांच्या मदतीने सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राडा केला. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल त्यांनी केला.

युवकांच्या एकत्र येण्याला भाजप घाबरले आहे

पुण्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराबाबत पवार म्हणाले, संपूर्ण देशात आणि राज्यात युवक सरकारच्या धोरणांच्या विरोधात एकत्र येत आहेत. युवकांची एकजूट पाहून सरकारला झुकावे लागले आहे. सरकार घाबरले असून भाजपच्या पोटात दुखू लागले आहे. पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहणार असल्याची माहिती असल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद घातला. त्यातून मारामारी झाली. मात्र, पुणे पोलिसांनी केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई केली. हा प्रकार निषेधार्ह आहे. युवकांच्या एकत्र येण्याला भाजप घाबरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये मध्यरात्री मोबाईल शॉपी फोडली; ३० लाखांचे ११५ हँडसेट लंपास
पुढील बातमी
नागेवाडी येथील आयटी पार्क प्रकल्पासाठी जागा हस्तांतरण अंतिम टप्प्यात; प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू

संबंधित बातम्या