सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, आधुनिक शिक्षण भगीरथ पदभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 66 वा. पुण्यतिथी कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्यावतीने शुक्रवार दि. 9 मे 2025 रोजी स.8.30 वा कर्मवीर समाधी परिसर, सातारा या ठिकाणी आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, ऍड. भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक, डॉ.अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य, जनरल बॉडी सदस्य, संस्थेचे लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, संस्थेचे हितचिंतक, पदाधिकारी, सर्व शाखांचे शाखाप्रमुख, यांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी देणगी रूपाने विशेष योगदान देणार्या मान्यवरांचा मा.खा. शरदरावजी पवार यांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये खा. सौ सुप्रियाताई सुळे, मॅनेजिंग ट्रस्टी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, थोर देणगीदार रामशेठ चांगू ठाकूर, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर, श्रीमती मनीषा जाधव, जनरल मॅनेजर जवाहरलाल नेहरू प्रशासन व सचिव, जवाहरलाल नेहरू फोर्ट, राजेंद्र आप्पा पवार, प्रतापराव गोविंदराव पवार, ड. अशोक बोरा, डॉ. शिवाजीराव कदम, शुभांगी घरत व महेंद्र शेठ घरत, हणमंत शिवदास ठिगळे या मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक विकास करून समाजाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणार्या संस्थेच्या विविध शाखांना ’कर्मवीर पारितोषिक’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्या प्राध्यापक व शिक्षकांना ’यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
याशिवाय क्रीडा क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून रयत शिक्षण संस्थेचा लौकिक वाढविणार्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. विशेषतः श्री. शिवछत्रपती पुरस्कार विजेते विद्यार्थी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कार्याची उत्कृष्ट नोंद करणार्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सातारा शहरातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.