सातारा : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आंदोलनाला आज सातारा जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद मिळाल्याने अनेक ठिकाणी औषध दुकाने बंद राहिली. त्यामुळे नियमित औषधांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. विशेषतः मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि इतर दीर्घकालीन आजारांवरील औषधे घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून आले.
औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जिल्हा केमिस्ट असोसिएशनने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. मागण्यांवर लवकर तोडगा न निघाल्यास पुढील टप्प्यात बेमुदत बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
दरम्यान, या परिस्थितीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यक औषधांचा मर्यादित आगाऊ साठा करून ठेवावा, असे सांगितले. औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संपाच्या पार्श्वभूमीवर काही पर्यायी सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हर यांसारख्या साखळी औषध दुकानांसह संघटनेबाह्य मेडिकल, रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्स आणि काही जेनेरिक औषध दुकाने सुरू राहणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच अन्य रुग्णालयांमधील आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत औषध विक्री परवाने सार्वजनिक हितासाठी देण्यात आले असल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.