सातारा : एआय (अर्टिफिशिअल इंटेलिजन्स्) तंत्रातून अनेक क्षेत्रात बदल होत असून कृषी क्षेत्रामध्ये या तंत्राचा वापर केला जात आहे. सर्कलवाडी ता. कोरेगांव येथे सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व मुलगा डॉ. युगंधर सरकाळे यांनी दहा एकर क्षेत्रावर एआय तंत्राचा वापर करत डाळिंबाची लागवड केली आहे. दरम्यान, या प्रयोगास नुकतीच जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
अवर्षणग्रस्त सर्कलवाडी येथे डॉ. सरकाळे यांनी येथील माळरानावर दगड फोडून पिकाऊ शेती केली आहे. कृषी क्षेत्रात जगातील होत असलेले बदल व स्वतः कडील कृषी ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानांचे प्रयोग १९९५ पासून करण्यास सुरूवात केली. गाव अवर्षणग्रस्त असल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेततळे घेतले आहे. शेतात अटोमेटेड यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे संपूर्ण शेतीफार्म उपग्रह प्रणालीशी कनेक्टेड असल्याने रोग, किड, सिंचन, खत व्यवस्थापन, हवामानाचे अंदाज दररोज मिळत असल्याने त्यापध्दतीने शेतात नियोजन केले जात आहे. शेतीत हरितगृह उभारणी, स्ट्रॅाबेरी नर्सरी, निर्यातक्षम द्राक्ष, परदेशी भाजीपाला, फुलशेती आदी पिकांची नाविन्यपूर्ण शेती यशस्वी करत उत्पादनात वाढ केली आहे. सध्या शेतात एक एकर क्षेत्रावर रेड जार्वी जातीचे पेरू, दोन एकरवर अंजिर, दोन एकरवर पपई, चार एकर आले व दोन एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी नर्सरी आहे. डॉ. सरकाळे यांच्याप्रमाणे मुलगा डॉ. युगंधर सरकाळे हायटेक शेतीचा वारसा पुढे नेत शेतात आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर देत आहेत. डॉ. युगंधर यांनी स्वतः अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एम एस व एआय मध्ये पीएचडी केली आहे. आपल्या या ज्ञानाचा वापर देशातील शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी त्यांनी स्वतः या तंत्राचा वापर करत दहा एकर माळरान क्षेत्रावर डाळिंब लागवड केली आहे. या बागेची चांगली वाढ झाली आहे. डाळिंबात हे तंत्रज्ञान वापरण्याची बहुधा पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे. तसेच बागेत विडमॅटचा वापर केला आहे. या विडमॅटमुळे तण नियंत्रण करण्यात मदत झाली आहे. प्रामुख्याने सर्व प्रकारच्या बागांमध्ये तणांचा नैसर्गिक पध्दतीने बंदोबस्त केल्यास मित्र किडींचे संगोपन होवून एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन उत्तम पध्दतीने होते. याच बरोबर जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी माती-पाणी परिक्षण आधारित खतांचे नियोजन केले जाते व सेंद्रिय कर्बाची मात्रा वाढविण्यासाठी जैविक स्लरीच्या वापरावर भर दिला जातो.
संपुर्ण क्षेत्रात तणनाशकाचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. दरम्यान या प्रयोगाची जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे या प्रकल्पाची भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी भाग्यश्री फरांदे म्हणाल्या, एआय तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर असून डॉ. राजेंद्र सरकाळे व मुलगा डॉ. युगंधर सरकाळे शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहेत. यावेळी प्रगतशील शेतकरी जीवन फडतरे, बळवंत सरकाळे उपस्थित होते.