सातारा : मनोमिलन होवो की न होवो सातारा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांमध्ये दोन्ही राजेंचे समर्थक उमेदवार असतील. मात्र दोन्ही राजांना आव्हान देणारी तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुप्त पातळीवर सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी मोट बांधण्याचे प्रयत्न येत्या काही दिवसात गतिमान होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. मनो मिलनाच्या शिलेदारांना आव्हान देणे तिसर्या आघाडीसाठी अग्निपरीक्षा ठरणार असली तरी भाजपच्या निष्ठावंतांची नाराजी आणि नव्या दमाचे मेहरबान यांना तिसर्या आघाडीला चुचकारावे लागेल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम सुरू झाले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या संस्थांच्या निवडणुकीसाठी शासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय हालचाली सुद्धा गतिमान होत आहेत. माझे मन मोठे आहे मात्र शिवेंद्रसिंहराजे बिझी आहेत असे म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाच्या चर्चांना हवा देण्याचा प्रयत्न केला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे हे सुद्धा राजकारणात मुरलेले असल्याने त्यांनी याबाबतचा निर्णय थेट पक्षश्रेष्ठींकडे सोपवून आपली सुटका करून घेतली आहे. मात्र तरीही बंडखोर आणि तिसरी आघाडी यांची शक्यता लक्षात घेता मी आणि तू याच्या पलीकडे सातार्याच्या राजकारणाचा परिघ नको म्हणून दोन्ही राजे एकत्र येऊ शकतात. 2007 च्या ऐतिहासिक मनोमिलनात तिसर्या आघाडीने आव्हान दिल्याने दोन्ही राजे अदालतवाड्याच्या साक्षीने एकत्र आले होते. पुढील दहा वर्ष सातारा नगरपालिकेने मनोमिलन अनुभवले मात्र 2019 च्या निवडणुकीत राजघराण्यातील सत्ताविरुद्ध सर्वसामान्य स्त्री असा संघर्ष उभा करून उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने एकतर्फी लढत जिंकली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव ही शिवेंद्रराजे यांच्यासाठी ठसठसणारी जखम ठरली होती. मात्र दरम्यानच्या काळात सातार्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. दोन्ही राजे गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पार्टीत दाखल झाले. एकमेकांवर तोंडसुख घेणारे दोन्ही राजे आधी लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र आले उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना राजकीय झप्पी देत सगळे मतभेद मिटवून टाकले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्ष आज्ञा पाळून उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य तर दिलेच, शिवाय बंधूप्रेमाची प्रचिती सुद्धा दिली.
सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी या दोन्ही राजांच्या नोंदणीकृत आघाड्या आहेत दोन्ही आघाड्यांकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण अशा दोन्ही लढतींचा प्रस्ताव दिला जाईल पण राजकीय महत्त्वकांक्षा कोणाच्याच लपून राहिलेल्या नाहीत. मनोमिलन जर झाले तर बंडखोरी ही होणार हे उघड आहे पंचवीस प्रभागात दोन्ही आघाड्या व बंडखोर उमेदवार यांची बक्कळ यादी तयार आहे. नगराध्यक्ष आरक्षणासह 25 प्रभागांची राजकीय समीकरणे हाताळताना दोन्ही राजांना आपले राजकीय कसब पणाला लावावे लागेल. भाजपचे मूळ निष्ठावंत अजूनही दोन्ही राजांच्या राजकीय रेट्यात भरडले जात आहे. 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सहा नगरसेवक निवडून आले होते तसेच दोन्ही राजांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारी तिसरी फळी सुद्धा सातार्यात शिल्लक आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे हे सातार्यात तिसरी मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. सातार्यात जर भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला आणि त्या राजकीय डावपेचात ते यशस्वी झाले तर त्यांच्या राजकीय कर्तबगारीची मोठी चुणूक असेल. तिसर्या आघाडीला ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी विशेषता जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार यांचा प्रयत्न राहणार हे उघड आहे तिसर्या आघाडीची ताकद ही संपूर्णपणे राजकीय स्वरूपाची ठेवताना राजे गटाला आव्हान देणारे उमेदवार शशिकांत शिंदे यांना शोधावे लागतील दीपक पवार यांच्याकडे पुन्हा एकदा शहरातील राजकीय रणनीती गतिमानकरण्याची जबाबदारी राहील मात्र त्यांची राजकीय विश्वासार्हता ही फारशी नसल्याने शशिकांत शिंदे यांना सातार्यात वेगळा पर्याय शोधावा लागेल, असा मतप्रवाह आहे. सातारा शहराची लोकसंख्या 1 लाख 81 हजार इतकी आहे. 60 हजार लोकसंख्येतून साधारण सात नगरसेवक नव्याने निवडून द्यावे लागणार आहेत. करंजे ग्रामीण, शाहूपुरी, खेड ग्रामपंचायत, शाहूनगर व दरे ग्रामपंचायतीच्या नवीन भागामध्ये तिसर्या आघाडीची राजकीय मोट बांधण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील बूथ आणि तेथील अध्यक्ष यांच्या बैठकीची आता तयारी चालवली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाचे सत्कार सोहळे संपल्यानंतर शशिकांत शिंदे सातार्यात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती आहे.