उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत FLNAT परीक्षा 29 मार्चला; निरक्षरांना साक्षरतेकडे नेण्यासाठी राज्यभर विशेष उपक्रम

by Team Satara Today | published on : 13 March 2026


सातारा : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत निरक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात येणारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) आता रविवार, 29 मार्च 2026 रोजी राज्यभर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संबंधित परीक्षा केंद्रांवर होणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिली आहे.

केंद्र शासनाने 2022-23 ते 2026-27 या कालावधीत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशातील 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींना साक्षर बनवणे हा आहे. यामध्ये वाचन, लेखन व संख्याज्ञान यांसारख्या मूलभूत कौशल्यांबरोबरच आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, कायदेविषयक जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्याची काळजी, बालसंगोपन, शिक्षण व कुटुंब कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या जीवनकौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. 


महाराष्ट्र शासनाने 14 ऑक्टोबर 2022 रोजी ही योजना राज्यात स्वीकारली असून, त्यानंतर 25 जानेवारी 2023 च्या निर्णयानुसार राज्य, जिल्हा, तालुका व शाळास्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यस्तरीय नियामक परिषदेचे अध्यक्ष शालेय शिक्षण मंत्री असून राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सन 2025-26 या वर्षात ‘उल्लास’ अॅपवर नोंदणी झालेल्या निरक्षर व्यक्तींसाठी तसेच पूर्वीच्या परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या किंवा ‘Need Improvement’ असा शेरा मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. संबंधित नोंदणीकृत व्यक्तींनी जवळच्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि स्वयंसेवक यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

या परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचन, लेखन आणि संख्याज्ञान अशा तीन विभागांमध्ये विभागलेली असून प्रत्येक विभाग 50 गुणांचा आहे. एकूण 150 गुणांची ही परीक्षा असून उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागात किमान 33 टक्के (16.5 गुण) तसेच एकूण 49.5 गुण मिळणे आवश्यक आहे. गरज भासल्यास कमाल 5 गुणांपर्यंत ग्रेस देण्याची तरतूद आहे.

परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी 3 तासांचा असून दिव्यांग परीक्षार्थ्यांना 60 मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. चाचणी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असून परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित स्वरूपात दिली जाणार आहे.

परीक्षेला येताना परीक्षार्थींनी नोंदणी फॉर्मसाठी एक आयकार्ड आकाराचा फोटो आणावा (फोटोबाबत सक्ती नाही). तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा बँक पासबुक यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. राज्यातील प्रौढांना साक्षर बनवून त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा हा महत्त्वाचा उपक्रम असून समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवा
पुढील बातमी
राज्य परिवहन महामंडळाचे राज्यातील तब्बल ७२ टक्के संपर्क क्रमांक बंद; तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासन उदासीन

संबंधित बातम्या