दिल्ली : जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक चेहरे चर्चेत आले. त्यापैकी मोहम्मद इरफान हे नाव सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत आहे. आंदोलनादरम्यान संविधान आणि युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी मांडलेली भूमिका अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. यानंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली.
काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या भेटीची माहिती देताना इरफान यांचे कौतुक केले. पक्षाच्या पोस्टमध्ये म्हटले की, मोहम्मद इरफान यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि स्पष्ट शब्दांत देशातील युवकांच्या वेदना आणि अपेक्षा मांडल्या. तसेच इरफानसारख्या प्रत्येक तरुणासोबत उभे राहण्याचा आणि समान संधी, सन्मान, बंधुता व प्रेमाने भरलेला भारत घडवण्याचा निर्धारही काँग्रेसने व्यक्त केला.
कोण आहेत मोहम्मद इरफान?
माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय मोहम्मद इरफान हे दिल्लीत फेरीवाला (हॉकर) म्हणून काम करतात. ते शाळेत गेले नसल्याचे सांगितले जाते. मात्र, स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने त्यांनी भारतीय संविधान आणि विविध सामाजिक विषयांचा अभ्यास केला आहे. जंतर-मंतर येथील आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता आणि तेथील त्यांच्या भाषणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.