वडूज : खटाव तालुक्यातील कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कणसेवाडी येथील ३५ वर्षीय युवक जागीच ठार झाला. महेश बाबासो मदने (वय ३५, रा. कणसेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महेश मदने हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरून (क्रमांक एम.एच. ४३ डब्ल्यू १६०८) कातरखटाव ते एनकुळ जाणाऱ्या रोडच्या कडेला डाव्या बाजूने सोलर प्लांटच्या गेटसमोरून घराकडे येत होता. दरम्यान, एनकुळ बाजूकडून कातरखटाव बाजूकडे येणाऱ्या खातवळ ते वडूज एसटी बसने (क्रमांक एम.एच. १४ एनई ५२८७) महेश याच्या दुचाकीला भरधाव वेगात हुलकावणी देत जोरदार धडक दिली. एसटी चालक तुळशीराम दादासो रणसिंग (रा. वडूज) याने बस निष्काळजीपणे चालवल्याने हा भीषण अपघात घडला.
एसटीच्या या भीषण धडकेत गंभीर दुखापत झाल्याने महेश मदने याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मयताचा चुलतभाऊ सुनील बबन मदने यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चालक तुळशीराम रणसिंग याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक पी. एल. जगदाळे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.