व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे लाखोंची मागणी; तिघांकडून पट्ट्याने मारहाण

by Team Satara Today | published on : 07 October 2026


सातारा : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाकडे दोन ते पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार सातारा शहरात उघडकीस आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला दांडके, लोखंडी पाईप व पट्ट्याने मारहाण करून शहरातील विविध भागांत फिरविल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
मोनिल चांद कुरेशी, ओम राजेंद्र गोसावी आणि स्वप्नील शंकर यादव (सर्व रा. गडकर आळी परिसर) अशी संशयितांची नावे आहेत. अनिकेत अरविंद साळुंखे (वय 20, रा. वरची पिलाणीवाडी, ता. सातारा, सध्या शाहू कला मंदिर परिसर) यांनी पोलिसांत तक्रार दिली.
अनिकेत हे ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करतात. मंगळवारी ते गडकर आळी परिसरात असताना संशयितांनी त्यांना अडविले. त्यांच्याकडील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. यावेळी सुमारे पाच हजार रुपये किमतीचा मोबाइलही काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून त्यांना शहरातील एका हॉटेल परिसरात, पेढ्याचा भैरोबा पायथा आणि गार्डन सिटी परिसरात नेण्यात आले. तेथे पुन्हा मारहाण करून पैशांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक ए. ए. बागवान तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यातून भारतीय जनता पक्षाच्या ‘विकसित भारत’चा संदेश; सेवा ज्योती यात्रेला उत्स्फूर्त प्रारंभ
पुढील बातमी
मित्राची वाट पाहत थांबलेल्या अल्पवयीन मुलास मारहाण; शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या