लवकरच पुणे पीएमपी बसेसमध्ये ‘एआय’चे कॅमेरे

by Team Satara Today | published on : 12 April 2025


पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीएमएल म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड महत्वाची संस्था आहे. लाखो पुणेकर या सेवेचा लाभ घेत असतात. पीएमपीएमएलकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. तसेच सुरक्षित प्रवास करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. पीएमपी बसने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता लवकरच पीएमपी बसमध्ये एआयवर आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पीएमपीएमएल एआयचा वापर करणारी देशातील पहिली प्रवासी वाहतूक संस्था असणार आहे.

पुण्यातील पीएमपी बसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) असणारे कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्यातील एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंगजवळ लावण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून चालकावर देखील लक्ष ठेवता येणार आहे. पीएमपी बसचे काही अपघात चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. तसेच काही चालक वाहतूक नियमांचे पालनही करत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींवर एआय कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

पुणे शहरातील अनेक मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन काही प्रवाशी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये बसवण्यात येणारे एआय कॅमेरे प्रवाशांची संख्या मोजून त्याचा संदेश वाहकाला देतील. बसमध्ये किती तिकीट काढले गेले आणि किती प्रवाशी आहेत त्याची माहिती वाहकाला मिळणार आहे. त्यामुळे बसमध्ये विना तिकीट असणाऱ्यांची माहिती वाहकाला दिली जाईल.

पीएमपी प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी पीएमपी अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या शेवटी नवी दिल्लीत बोलवण्यात आले. त्या ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्याबाबत सादरीकरण होणार आहे. याबाबतची मंजुरी मिळताच सर्व बसमध्ये एआयचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या योजनेवर सुमारे पाच कोटींचा खर्च आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लग्नानंतर पंधराव्या दिवशीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू
पुढील बातमी
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या सवयींचा करा अवलंब

संबंधित बातम्या