सातारा : गौरीच्या फराळाची सजावट आणि बाप्पांचा प्रसाद यंदा स्वस्त होणार आहे. बाजारपेठेत सफरचंदाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज साताऱ्याच्या बाजार समितीत सुमारे १२ टन सफरचंदाची आवक होत आहे. सध्या किरकोळ बाजारपेठेत सफरचंदाचा दर १७५ ते २०० रुपये प्रतिकिलो असा आहे. हेच दर गणेशोत्सव काळात १५० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत येतील, अशी शक्यता आहे.
गणेशोत्सवात ११ दिवस सकाळी व संध्याकाळी मंडळाचे कार्यकर्ते आणि घरोघरी गणेशाची आरती केली जाते. त्यानंतर आवडीने उपस्थितांना प्रसाद दिला जातो. त्यामध्ये प्राधान्याने चिरमुरे, फरसाण, मिठाई याबरोबरच फळांचा वापर केला जातो. त्यासाठी सफरचंद उपयुक्त ठरते. त्याशिवाय गौरी आगमनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपुढे फराळाचे साहित्य ठेवले जाते. विविध प्रकारची फळे ठेवली जातात. यामुळे हमखास उत्सव काळात फळांचे दर वाढतात. मात्र, यंदा किमान सफरचंद स्वस्त मिळू शकणार आहेत.
डाळिंबाची आवक कमी असल्याने त्याचा भाव आजही तेजीत राहिला आहे. आता गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने फळांच्या मागणीला वाढ होणार हे लक्षात घेऊन बाजार समितीत सफरचंदाची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. सध्या दररोज १२ टन सफरचंद दाखल होऊ लागले आहेत. यामुळे आगामी आठ दिवसांत सफरचंदाचा दर किरकोळ बाजारात २५ ते ५० रुपयांपासून उतरण्याची शक्यता आहे.
आठवड्यात दर होतील कमी : सातारा बाजार समितीमधील फळांचे विक्रेते फारुख बागवान म्हणाले, "उत्सव काळात फळांना जादा मागणी असते. त्या अनुषंगाने विविध प्रकाराची फळे मागवली जात आहेत. गणेशोत्सव काळात सफरचंदला मोठ्या प्रमाणात असलेली मागणी लक्षात घेता सिमला येथील सफरचंद साताऱ्यात आणली आहेत. त्याचा दर आठवड्याभरात आतापेक्षा निश्चित कमी असणार आहे."