मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

by Team Satara Today | published on : 28 July 2025


सातारा : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ झाला. येणाऱ्या वर्षभरात पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे सांगून हा उपक्रम सर्व ग्रामपंचायतींना आदर्शवत ठरेल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ग्रामपंचायतच्या लोकनेते बाळासाहेब देसाई ग्राम सचिवालयामध्ये या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच किरण दशवंत, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण, ग्रामसेवक प्रमोद ठोके, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री देसाई म्हणाले, 1500 हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मल्हारपेठ ग्रामपंचायतने डिजिटल नेमप्लेट आणि क्यू आर कोड प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिजिटल युगाकडे झेप घेतली आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामप्रशासन अधिक लोकाभिमुख आणि अधिक स्मार्ट बनेल. लोकांना विविध प्रकारच्या सेवांसाठी ग्रामपंचायतमध्ये हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही. यामुळे त्यांच्या वेळ आणि पैसा यांचीही बचत होईल असेही सांगितले.

मल्हारपेठ ग्रामपंचायतीमधील प्रत्येक घराला डिजिटल नेमप्लेट देण्यात आली आहे. यावर दिलेल्या क्यूआर कोड स्कॅन करताच मालमत्ता कोणाच्या नावावर आहे, यावर कोणता कर भरलेला आहे, कोणता कर भरावयाचे बाकी आहे याबाबतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. घराचा आणि घर मालकाचा फोटो पाहण्याची सुविधाही यामध्ये देण्यात आलेली आहे. कर मागणी पावती डाऊनलोड सुविधा असून चालू आणि थकीत कर ऑनलाइन भरण्याची सुविधा आहे.

सदरची डिजिटल नेमप्लेट गडद ग्रे रंगाची ॲल्युमिनियमची आहे. यावर मिळकत क्रमांक सोबत क्यूआर कोड आहे. प्रत्येक मिळकतीला एक युनिक नंबर देण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम साकारला आहे. या उपक्रमाद्वारे सर्व रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे. यातून पारदर्शकता वाढीस लागणार आहे. ग्रामप्रशासन अधिक लोकाभिमुख आणि अधिक स्मार्ट बनणार आहे. जीआयएस आधारित स्मार्ट नकाशाही तयार करता येईल. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनाच्या सूक्ष्म नियोजनासाठीही हे ॲप उपयुक्त ठरेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट
पुढील बातमी
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

संबंधित बातम्या