रेवंडे गावातील महिला पाणी प्रश्नावर आक्रमक

सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीत ठिय्या

by Team Satara Today | published on : 23 September 2024


सातारा : रेवंडे गावातील महिलांनी सोमवारी आक्रमक होत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांच्या दालनामध्ये गावामध्ये पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून ठिय्या मारला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी तुमचे अधिकारी केवळ टक्केवारी मध्ये गुंतलेले आहेत, असा आरोप करून त्यांना परखड जाब विचारला. सुमारे तासभर ही शाब्दिक बाचाबाची सुरू होती. गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी या गावाचा दौरा करून लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
रेवंडे, ता. सातारा येथे आठ महिन्यापूर्वी झालेली पेय जल योजना अत्यंत निकृष्ट झालेली असून त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून पाणी पुरवठा अत्यंत विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना निरोप देऊन गावात बोलावून घेतले व वस्तुस्थिती दाखविली. त्यानंतर आज सकाळी महिलांसह शिवसैनिकांनी पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांना घेराव घातला. शिवसैनिक आणि महिला यांची आक्रमकता पाहून पंचायत समितीच्या अभियंत्याची भंबेरी उडाली. पाणी पुरवठा शाखा अभियंता कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे सर्वजण जास्तच आक्रमक झाले. शेवटी सर्व दुरुस्त्या वेळेत करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन गट विकास अधिकारी यांनी दिल्यावर शिवसैनिक व महिला मंडळ यांनी मुदत देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
या प्रसंगी तालुका प्रमुख सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, अनिल गुजर, पठाण, रवींद्र पोळ, अक्षय वाघमारे, कुंदन जाधव, अमोल साळुंखे, सुनील मोहिते, अजय सावंत, राहुल साळुंखे, राम साळुंखे, किशोर साळुंखे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली भोसले, शोभा भोसले, विनायक भोसले, संतोष भोसले, नंदा भोसले, विजया भोसले, अनुसया भोसले आदी ग्रामस्थ, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्मवीरांचे आयुष्य व विचार पुढील पिढ्यांना प्रेरणादायी
पुढील बातमी
शेती पंप विज बिलासंदर्भात स्वाभिमानीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

संबंधित बातम्या