सातारा : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा ४.० या अभियानात तसेच भुमी थिमॅटीक उपक्रमात सातारा पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही श्रेणीत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल सातारा पालिकेस ८ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार असून त्याचे वितरण लवकरच होणार आहे.
राज्य शासनाच्यावतीने पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, यासाठी माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा चौथा टप्पा सुरु असून यात सातारा पालिकेने सहभाग नोंदवला होता. सहभाग नोंदवल्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर उर्जा प्रकल्पासह इतर पर्यावरण पुरक प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. याचबरोबर शहरातील वातावरणातील प्रदुषण पातळी कमी करण्यासाठीचे उपक्रम राबवत सातारा शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, संगोपनाचे काम हाती घेतले होते. या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे राज्य शासनाच्यावतीने मुल्यांकन करण्यात आले होते.
यानुसार माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल शासनाच्यावतीने जाहीर केला. १ ते ३ लाख लोकसंख्येच्या निकषात या गटात साताऱ्यासह १३ पालिकांचा सहभाग होता. यात सातारा पालिकेने बाजी मारत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवला. याच अभियानाचा भाग असणाऱ्या भुमी थिमॅटीकमध्येही सातारा पालिकेने पहिला क्रमांक मिळवला. अभियानातील पहिल्या क्रमांकाबद्दल सातारा पालिकेस सहा कोटी तसेच भुमी थिमॅटीकमधील उच्चतम कामगिरीबाबत दोन कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे.
माझी वसुंधरा अभियानात सातारा पालिका अव्वल
by Team Satara Today | published on : 27 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा