लाडक्या बहिणींकडून ओवाळणी वसूल

सुधीर राऊत : गॅस दरवाढीमुळे बजेट कोलमडले

by Team Satara Today | published on : 08 April 2025


सातारा : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपये वाढवून लाडक्या बहिणांना गिफ्ट दिले आहे. त्यामुळे महिलांचे घर चालवण्याचे बजेट कोलमडणार आहे. बाजारात तेलाच्या किमती कमी होत असताना त्यात दर कमी करण्यास मोदी सरकार सक्षम नसल्याचे दिसत आहे. महायुती सरकार लाडक्या बहीण योजनेची दिलेली ओवाळणी वसूल करत असल्याची खोचक टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केली.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, महायुती सरकारकडून मिळालेली लाडक्या बहीण योजनेतील 1500 रुपयांची ओवाळणी केंद्र सरकार मात्र महागाईचे 'गिफ्ट' देऊन दुसऱ्या हाताने काढून घेत आहे. घरगुती सिलिंडरच्या रक्कमेत दरवाढ करून लाडक्या बहिणींना खूशखबर दिली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या दरवाढीचे कारण दिले जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी होत असताना त्यात दर कमी करण्यास मोदी सरकार सक्षम नसल्याचे दिसत आहे. उलट तेलाच्या किंमतवाढीची टांगती तलवार सर्वसामान्यांवर आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम महिना 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. पुन्हा हे सत्तेत आल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले आहे. त्यात आता सिलिंडरच्या 50 रुपये किमत वाढवून सरकारने सर्वसामान्यांना झटका दिला आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत 503 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 553 रुपयांना मिळेल. तर ही योजना सोडून असलेला एक सिलिंडर 803 रुपयांवरून 853 रुपये इतका झाला आहे. यामुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडणार असून त्यास हे तिघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका राऊत यांनी केली. तसेच याबाबत शिवसेनेच्यावतीने जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शैक्षणिक साहित्य वाटप करून डॉ. आंबेडकर जयंतीचा निर्धार : श्री रमेश उबाळे
पुढील बातमी
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक क्षणार्धात होईल स्वच्छ!

संबंधित बातम्या