पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात अहिल्यानगर पाणीपुरवठा अंतर्गत जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सदानंद दाते, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अहिल्यानगरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता राम लोलपोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी सुरू असलेल्या योजना गतीने पूर्ण कराव्यात. समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणीपुरवठा योजनेतील कामांची तपासणी करण्यात यावी. जे ठेकेदार किंवा अधिकारी कामामध्ये विलंब करतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

पाणीपुरवठा योजना ही ग्रामीण भागांतील नागरिकांसाठी जीवनावश्यक आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठोस रोडमॅप तयार करणे, पाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणे आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.

मागील बातमी
रशियन संसद ड्युमाचे अध्यक्ष वोलोदीन यांनी घेतली राज्यपालांची भेट
पुढील बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट

संबंधित बातम्या