सातारा-सांगली विधान परिषद: महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी; मात्र १०० मते फुटल्याने भाजपला आत्मपरीक्षणाची गरज

by Team Satara Today | published on : 22 June 2026


सातारा : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत महायुतीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. विजयानंतरही महायुतीची तब्बल १०० मते फुटून ती महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भाजपला आता यावर आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

​एकीकडे विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी फोडण्याचे राजकारण सुरू असताना, दुसरीकडे कोणतीही ठोस सत्ता हातात नसताना महाविकास आघाडीने महायुतीची १०० मते आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. हा बदल महायुतीसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. या निवडणुकीच्या तिकीट वाटपादरम्यान सातारच्या दोन्ही राजघराण्यांच्या, म्हणजेच खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मताचा व निर्णयाचा योग्य विचार केला गेला नव्हता, अशी चर्चा आहे. केवळ पक्षाचा आदेश म्हणून दोन्ही राजेंनी महायुतीचे काम केले असले, तरी त्यांची अंतर्गत नाराजी या निवडणुकीच्या निकालातून आणि मतफुटीतून उघड झाली आहे.

​तसेच, निकाल जाहीर होण्यापूर्वीच धैर्यशील कदम यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात विजयाचे पोस्टर्स लावून जल्लोष सुरू केला होता. मात्र, या पोस्टर्सवर सातारचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फोटो डावलण्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या या अतिउत्साहामुळे आणि स्थानिक नेत्यांना डावलण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, या सर्व घडामोडींमुळे महायुतीमधील अंतर्गत समन्वय चव्हाट्यावर आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सांगली–सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम दणदणीत विजयी; मविआचे अभयसिंह जगताप पराभूत

संबंधित बातम्या