कराड रेल्वे स्टेशनवर पुणे-मिरज रेल्वेच्या ॲक्सल बॉक्सला आग

कराड : कराड  रेल्वे स्टेशनवर मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज रेल्वेच्या इंजिन खालील व्हील ॲक्सल बॉक्सला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या घटनेमुळे प्रवाशांसह रेल्वे स्टेशनवर गोंधळ उडाला. घटनेचे गांभीर्य ओळखत कर्मचाऱ्यांनी आग विझविल्याने प्रवाशासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य रेल्वेची पुणे-मिरज रेल्वे ही पुण्याहून मिरजला जाण्यासाठी सुटली. कराड  रेल्वे स्टेशनवर ही एक्स्प्रेस दुपारच्या सुमारास आली. स्टेशनवर आल्यानंतर अचानक इंजिन खाली असणाऱ्या ऑइल बॉक्सने पेट घेतला. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. प्रवाशासंह तेथे असणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. या रेल्वेच्या सात डब्यात सुमारे ३०० प्रवासी प्रवास करीत होते. आगीची घटना समजताच प्रवासी घाबरून रेल्वेतून खाली उतरले. 

रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे येथे ही घडलेली घटना कळविली. तोपर्यंत कराड रेल्वे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यानंतर लगेच वंदे भारत एक्स्प्रेसचे पुणे येथील पथक कराड रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सेफ्टी फायरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कराड नगरपालिकेचे अग्निशमन गाडीही घटनास्थळी पोहोचली. आग आटोक्यात येईपर्यंत सर्व प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेने मिरजला पाठवण्यात आले. आग आटोक्यात आल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मागील बातमी
धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांची थेट हायकोर्टात धाव
पुढील बातमी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

संबंधित बातम्या