सातारा : घरातील फरशी धुतल्यानंतरचे पाणी गेटबाहेर टाकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजार्यांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची घटना संगमनगर येथील पंचवटी कॉलनीत घडली. या प्रकरणात एका महिलेसह तिच्या आईला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत चौघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवयानी बाळकृष्ण लवंगारे यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेजार्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मीना शंकर पवार, विकास शंकर पवार, आदित्य मनोहर पवार आणि बाली मनोहर पवार यांनी शिवीगाळ करत हाताने व काठीने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.