कोरेगाव आगाराची अचानक बस जळाली

by Team Satara Today | published on : 16 January 2025


कोरेगाव : येथील आगाराची वाठार स्टेशन-भाडळेमार्गे- कोरेगाव बस बुधवारी दुपारी हासेवाडी (ता. कोरेगाव) येथे प्रवासी चढ-उतार करताना अचानक बसने पेट घेतला. यामध्ये केबिनसह काही सीट जळून खाक झाल्या. सुदैवाने प्रवासी, चालक व वाहक सुखरूप आहेत. घटनेची नोंद वाठार पोलिसांत झाली असून, सुमारे सव्वालाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत एसटीचे अधिकारी, वाठार पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कोरेगाव आगाराची वाठार स्टेशन-भाडळेमार्गे-कोरेगाव ही बस (एमएच ११ बीएल ९३३७)  दुपारी सव्वाबाराच्या सुमारास चालक अनिल एकनाथ खताळ व वाहक एम. बी. यादव हे दोघे घेऊन निघाले होते. बस हासेवाडी बस थांब्यावरती पोचली असता, प्रवासी चढ-उतार सुरू झाली. त्याच वेळी बसच्या केबिनमधून धूर आणि नंतर आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. प्रकार लक्षात येताच चालकासह बसमधील ११ प्रवासी, वाहक गाडीतून उतरले.

घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थ, युवक, चालक, वाहकांनी लगतच्या एका बोअरवेलमधून पाण्याची पाइप मिळवून आग विझवण्यास सुरुवात केली. यामध्ये अखेर आग विझविण्यात यश मिळाले. यामध्ये टायर, बहुतांश सीट आगीतून वाचल्या. मात्र, चालक केबिन पूर्णतः जळून मोठे नुकसान झाले आहे. बसचे सर्व टायरही सुस्थितीत राहिले आहेत.

घटनेची माहिती मिळताच कोरेगावच्या आगारप्रमुख नीता जगताप यांनी सहकारी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या, तसेच प्रवासी, चालक, वाहकांची विचारपूस केली. बसच्या नादुरुस्तीबाबतही लॉकशिटमध्ये काही उल्लेख नाही. चालकाचा काहीही रिमार्क नव्हता असे, आगारप्रमुख नीता जगताप यांनी सांगितले.

एसटीचे विभागीय यंत्र अभियंता विकास माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अंतर्गत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज त्यांनी वर्तविला. बसचे अंदाजे सव्वालाख रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

हासेवाडीत बस जळीत झाल्याचे समजताच तातडीने अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुदैवाने प्रवासी, चालक, वाहक पूर्णतः सुखरूप आहेत. तीव्र उष्णता किंवा अंतर्गत शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घेतला असेल. आग विझविण्यात ग्रामस्थ, युवकांसह चालक, वाहकांनी मोठे योगदान दिले. अशा घटना पुन्हा घडणार नाही याची पूर्णतः दक्षता घेण्यात येईल. - रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, सातारा विभाग.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाळेत सोडणार्‍या खासगी बस चालकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोनजणांना अटक
पुढील बातमी
भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या