लालसर, गुलाबी दाणे असणारं डाळिंब अनेकांचं आवडीचं. दाबेली, भेळ, रायता, कोशिंबीर, साबुदाण्याची खिचडी अशा पदार्थांमध्येही डाळिंबाचे दाणे हमखास घातले जातात. डाळिंबामुळे त्या पदार्थांची चव जास्त खुलते. पदार्थांची चव खुलविण्यासाठी डाळिंब जसं फायदेशीर ठरतं, तसंच ते आरोग्यासाठीही अतिशय लाभदायी असतं. त्यांच्यामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स, ओमेगा ६ भरपूर प्रमाणात असतं. शिवाय डाळिंबातून व्हिटॅमिन सी देखील मिळतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचा फायदा होतो. याशिवाय डाळिंबातून व्हिटॅमिन के, फायबर, लोह, पोटॅशियम, झिंक ही खनिजेही मिळतात (how to use Pomegranate peel for skin care?). पण जेवढे फायदे डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने मिळतात, तेवढेच फायदे डाळिंबाच्या सालांमधूनही मिळतात. बघा ते नेमके कोणते…
डाळिंबाच्या सालींचे फायदे :
१. डाळिंबाच्या साली उन्हामध्ये वाळवून घ्या. पुर्णपणे वाळल्यानंतर त्याची पावडर करा. या पावडरमध्ये थोडे गुलाबजल घालून तो फेसमास्क चेहऱ्याला लावा. डेडस्किन, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स जाऊन त्वचा अगदी स्वच्छ, नितळ होईल.
२. डाळिंबाच्या सालांची पावडर आणि दही हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून तीन वेळा लावला तर त्वचा खूप चमकदार होते.
३. जर तोंडाची नेहमीच दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाच्या सालांची पावडर पाण्यामध्ये मिसळा. या पाण्याने गुळण्या करा. रोज सकाळी हा उपाय केल्यास दिवसभर तोंडातून घाण वास येणार नाही.
४. खोकला, पोटामध्ये जंत होणे, जुलाब होणे असा त्रास होत असेल तर डाळिंबाच्या सालांचा काढा करून पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे या आजारांवर चटकन आराम मिळतो.
५. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी डाळिंबाच्या सालांची पावडर पाण्यात घालून उकळून घ्या आणि त्यानंतर तो काढा प्या.
६. ज्यांच्या चेहऱ्यावर हायपर पिगमेंटेशन असते म्हणजेच वांगाचे डाग असतात, त्यांच्यासाठीही डाळिंबाच्या सालांची पावडर अतिशय उपयुक्त ठरू शकते. यासाठी डाळिंबाच्या सालांची पावडर, थोडेसे जायफळ एकत्र करून वांगाच्या डागांवर लावा आणि ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास डाग कमी होतील.