नितीन पाटील यांच्या खासदारकीच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी

by Team Satara Today | published on : 22 August 2024


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे अर्ज छाननी नंतर राज्यसभेचे बिनविरोध खासदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीन काकांच्या खासदारकीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे नितीन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची नवी इनिंग सुरू होणार आहे आणि त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला तिसरा खासदार मिळणार आहे. 
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा देण्यात आली. या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी मुंबईत उमेदवारी अर्ज भरला होता. गुरुवारी दाखल अर्जाची विधान भवनामध्ये छाननी झाली. यामध्ये पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. तसेच अन्य एकाने अर्ज भरलेला, पण तो छाननीत बाद झाला. यामुळे नितीन पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवड झाल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत केवळ घोषणा बाकी होणे आता शिल्लक राहिले आहे.
वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे नितीन पाटील हे बंधू आहेत. मागील सव्वा वर्षापासून ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. नितीन पाटील यांचे वडील दिवंगत लक्ष्मणराव पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघाचे 1999 ते 2009 पर्यंत खासदार राहिले होते. वाई तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये तसेच विशेषतः नितीन काका समर्थकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत नितीन पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक होते. मात्र जागा वाटपात मतदारसंघ भाजपला गेल्यामुळे नितीन काकांना आपल्या राजकीय आकांक्षांना मुरड घालावी लागली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले आणि त्याचवेळी पाटील यांना राज्यसभेत खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. अजितदादा यांनी हे आश्वासन पाळले. नव्या राजकीय कारकिर्दीमध्ये सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेची बळकटी करणे हे नवीन आव्हान नितीन काका यांच्या पुढे असणार आहे. आगामी काळात विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांसाठी त्यांना सक्रिय रहावे लागणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
पुढील बातमी
उत्कृष्ट वार्तांकनासाठी जावली पंचायत समिती करणार इम्तियाज मुजावर यांना सन्मानित

संबंधित बातम्या