भुजबळ कुटुंबीयांकडून मरणोत्तर देहदानाचा संकल्‍प

by Team Satara Today | published on : 03 September 2025


सातारा  : माणसाच्या रक्तात माणुसकी असेल, तर त्‍याच्‍याकडून होणाऱ्या समाजकार्याचा प्रत्‍यक्ष लाभ अनेक गरजूंना होतो. याच उद्देशाने प्रेरित होऊन कोंडवेचे सुपुत्र, तब्‍बल ५७ वेळा रक्‍तदान करणारे जिल्‍हा परिषद शाळेचे मुख्‍याध्‍यापक दीपक भुजबळ यांनी त्‍यांच्‍या कुटुंबीयांसह मरणोत्तर देहदानाचा संकल्‍प केला आहे.

भुजबळ यांनी वयाच्या अठराव्‍या वर्षी प्रथम रक्तदान केले आणि ५७ व्या वर्षी ५७ वे रक्तदान केले. सातारा तालुक्यातील कोंडवे गावचे सुपुत्र असलेल्या श्री. भुजबळ यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, दलित अशा गावकुसाबाहेरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी त्यांनी व्यक्तिगत परिश्रम घेतले.

भुजबळ यांच्‍याबरोबरच पत्नी कांचन, मुलगाओमकार व कन्या क्रांती यांनी मरणोत्तर देहदान करून आपल्या देहाचाही उपयोग समाजासाठी व्हावा, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. अवयव दानाचे महत्त्व ते लोकांना ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्ती पटवून देत आहेत.

आज अनेकदा रक्ताचा तुटवडा भासत आहे, अशा वेळेला भुजबळ हे स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यास जातात. याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून साक्षरता प्रसार, साक्षरता वारी, साक्षरता ज्ञानरथ अशा उपक्रमांमध्येही ते सहभागी होत आहेत. त्यांनी आपल्या गाडीमध्ये फिरती शाळा व फिरते वाचनालय सुरू केले होते. ‘तंबूतील शाळा’ हा एक विशेष उपक्रम सुरू केला होता. त्यांनी गोरगरिबांच्या मुलांना मोफत लाइफ जॅकेट देऊन पोहण्यास शिकवले. कोणाचाही बुडून मृत्यू होऊ नये म्हणून ते पोहण्याचा उपक्रम राबवत आहेत. श्री. भुजबळ यांनी या संकल्‍पाद्वारे बहुजन समाजामध्ये रक्तदान व मरणोत्तर देहदानाची ज्‍योत लावल्‍याबद्दल विविध स्तरांतून त्‍यांचा सन्‍मान होत आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दूध दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
पुढील बातमी
मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर

संबंधित बातम्या