कराड : काल- परवापर्यंत आईच्या मायेच्या कुशीत अन् वडिलांच्या आधाराने वाढणाऱ्या दोन चिमुरड्यांच्या आयुष्यात एका रात्रीत काळोख पसरला. चौथीत शिकणारा मुलगा आणि दुसरीत शिकणारी त्याची बहीण पोरकी झाली, त्यांची आई रोहिणी जांभळे यांचा दुर्दैवी अंत झाला, तर पत्नीच्या खुनात वडील दत्तात्रय पोलिसांच्या ताब्यात गेल्याने दोन्ही मुलांच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र एकाच रात्री हरपले. त्यांचा सांभाळ अन् शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार आणि त्यांच्या भविष्याला आधार कोण देणार? हा प्रश्न मात्र आजतरी आव्हानात्मक बनून पुढे आला आहे.
मलकापूर येथील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री घडलेल्या घटनेने जांभळे कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरामध्ये पती-पत्नीमध्ये वाद सुरू असताना दोन्ही मुले पार्किंगमध्ये खेळत होती. त्याचवेळी घरात झालेल्या दुर्दैवी घटनेची कल्पना या कोवळ्या जिवांना नव्हती. काही वेळाने वडिलांच्या पायावर रक्ताचे डाग दिसल्यानंतर मुलगा घरात धावला. तेथे आईची अवस्था पाहिल्यानंतर त्याने शेजाऱ्यांना माहिती दिल्याचे पोलिसांच्या सांगण्यातून समोर आले होते.
त्यानंतर घडलेल्या घटनांनी या मुलांच्या बालमनावर किती मोठा आघात झाला असेल, याची कल्पनाही करवत नाही. नातेवाइकांचाही आधार मर्यादित जांभळे कुटुंबाची परिस्थितीही या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न अधिक गंभीर करणारी आहे. दत्तात्रय जांभळे यांच्या भावाचे यापूर्वीच निधन झाले आहे. घरातील वयोवृद्ध आई अंथरुणाला खिळून असून, त्या स्वतः कोणत्याही हालचाली करू शकत नाहीत.
रोहिणी जांभळे यांचा भाऊही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून तो हातावर पोट भरणारा आहे. त्याच्यावरही कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे या दोन मुलांच्या दीर्घकालीन संगोपनाची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. एका वादाचा परिणाम एका कौटुंबिक वादाचा शेवट महिलेच्या मृत्यूने झाला; मात्र त्याची शिक्षा दोन चिमुरड्यांच्या आयुष्याला भोगावी लागत आहे. आईच्या मायेपासून आणि वडिलांच्या आधारापासून वंचित झालेल्या या भावंडांचे आयुष्य कोणाच्या आधारावर उभे राहणार, हा प्रश्न उभा आहे.
परतणार नाही आईची माया आईच्या मृत्यूनंतर मुलांच्या आयुष्यात निर्माण झालेली मायेची पोकळी कोणताही आधार पूर्णपणे भरून काढू शकणार नाही. त्यातच वडील पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांच्यापासून मुले दूर झाली आहेत. त्यामुळे घटनेची सर्वाधिक झळ निष्पाप जिवांना बसली आहे. त्यांना केवळ आर्थिक मदतीची गरज नाही. त्यांच्या डोक्यावर प्रेमाचा हात, सुरक्षित घर, नियमित शिक्षण आणि मानसिक आधाराचीही तितकीच गरज आहे. यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे बालपण कायमचे या दुःखाच्या सावटाखाली जाऊ नये, यासाठी कुटुंबीयांसह समाज आणि प्रशासनानेही संवेदनशीलतेने पुढे येण्याची गरज आहे.