लमाण समाजातील पोराची अभियंता पदाला गवसणी; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची प्रेरणादायी यशोगाथा

by Team Satara Today | published on : 28 February 2026


सातारा :  विजापूरहून पोटाची खळगी भरण्यासाठी तारळे विभागात आलेल्या एका लमाण समाजातील कुटुंबाच्या पोराने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘एमआयडीसी सहाय्यक अभियंता (वर्ग-२)’ पदाला गवसणी (MIDC Assistant Engineer) घातली आहे. विलास भोजलिंग चव्हाण असे या जिद्दी तरुणाचे नाव असून, त्याच्या या यशाने ‘श्रमाला कष्टाची जोड दिली की परमेश्वरही प्रसन्न होतो,’ याचा प्रत्यय दिला आहे.

रस्त्याच्या कडेला बसून हातात घन घेऊन दगड फोडणारे आई-वडील... अंगावर उडणारी डबर आणि घामाच्या धारा... अशा भीषण गरिबीत ज्याचं बालपण गेलं, त्या मजुराच्या पोराने आज आभाळाला गवसणी घातली आहे. विलासचे आई-वडील सुमारे ३० वर्षांपूर्वी रोजगारासाठी विजापूरहून जिल्ह्यात आले. रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचे कष्ट उपसणाऱ्या भोजलिंग व गंगूबाई यांच्या पोटी विलासचा जन्म झाला. 

घरात लमान समाजाची वेगळी बोली भाषा; पण विलासने जिद्दीने येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पाऊल ठेवले. सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण तारळेतील श्री छत्रपती विद्यामंदिरमध्ये पूर्ण केले. परिस्थिती इतकी हलाखीची होती, की अभ्यासासाठी साधी साधनसामग्रीही दुरापास्त होती; पण विलासच्या डोळ्यात अधिकारी होण्याचे स्वप्न होते.

विलासने सातारा येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमधून बारावी, वारणानगरमधून बीई (स्थापत्य), त्यानंतर थेट पुणे येथील प्रतिष्ठित सीओईपीमधून एमटेक पूर्ण केले. विशेष म्हणजे, आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात कोणतीही महागडी ‘ॲकॅडमी’न लावता, केवळ स्वतःच्या कष्टावर आणि जिद्दीवर त्याने पहिल्याच प्रयत्नात राज्यात ३६ वी रँक मिळवत अधिकारीपद पटकावले. खासगी नोकरी करत असतानाही त्याने अभ्यासाचा सराव सोडला नाही.

परप्रांतीय पार्श्वभूमी असूनही मराठीतून शिक्षण घेत त्याने हे यश संपादन केले आहे. विलासच्या या यशामुळे तारळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. ‘‘परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वप्न पाहणे सोडू नका आणि मेहनत करत राहा,’’ हा त्याने दिलेला संदेश आज हजारो गरजू विद्यार्थ्यांसाठी ऊर्जेचा स्रोत ठरत आहे.

हे यश माझ्या आई-वडिलांच्या घामाचे फळ

माझ्या आई-वडिलांनी उन्हातान्हात मजुरी करून मला शिकवले. त्यांची कष्ट उपसणारी फाटकी झोळी आणि हातावरचे फोड पाहून मला नेहमी वाटायचे, की ही परिस्थिती बदलायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आज मी ‘साहेब’ झालो असलो, तरी हे यश माझ्या आई-वडिलांच्या घामाचे फळ आहे.

- विलास चव्हाण


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
SQAAF बाह्य मूल्यांकनात छत्रपती शिवाजी कॉलेजला ‘अ प्लस ’ श्रेणी ; महाविद्यालयाच्या कार्याची राज्यस्तरीय दखल
पुढील बातमी
भाषेचा गोडवा टिकवायला हवा, मराठी ही ज्ञानभाषा म्हणून पुढे यायला हवी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या