सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी चिक्या ऊर्फ गणेश दिनकर गायकवाड (रा. दहिवडी, ता. माण) यास पोक्सो कायदा कलम 8 अन्वये 5 वर्षे सश्रम कारावास 20 हजार रुपये दंड, कलम 9 (टी), 10 अन्वये 7 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, पोक्सो कायदा कलम 12 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी पोलीस स्टेशनला तक्रारदारांनी दि. 7 डिसेंबर 2011 रोजी तक्रार दिली होती कि, दि. 6 डिसेंबर रोजी माण तालुक्यातील एका गावच्या हद्दीतील मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असतानाही यातील आरोपी चिक्या ऊर्फ गणेश दिनकर गायकवाडयाने तिचा विनयभंग केला. या आशयाच्या फिर्यादीवरुन दहिवडी पोलीस स्टेशनला गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्ह्याचा तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांनी करून वडूजचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलेले होते.
न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने अजित प्रताप कदम साबळे यांनी काम पाहिले असून त्यांचा युक्तीवाद, साक्षीदाराचे जबाब, कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरुन वडूजचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी आरोपी चिक्या ऊर्फ गणेश दिनकर गायकवाड (रा. दहिवडी, ता. माण) यास पोक्सो कायदा कलम 8 अन्वये 5 वर्षे सश्रम कारावास 20 हजार रुपये दंड, कलम 9 (टी), 10 अन्वये 7 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, पोक्सो कायदा कलम 12 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रॉसिक्यूशन स्क्वाडच्या महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी केलेला आहे.