सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सातारा शहरात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजधानी साताऱ्यातील पोवई नाका परिसरात उभारलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे स्मरण करण्यात आले. उपस्थित शिवभक्तांनी छत्रपतींच्या कार्याला वंदन करत हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा जागर केला. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. न्याय, समानता, शौर्य आणि स्वाभिमान या मूल्यांवर उभे असलेले शिवरायांचे राज्यकारभाराचे तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवरायांचा इतिहास हा केवळ अभिमानाचा विषय नसून तो प्रेरणा घेण्याचा स्रोत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, राम हादगे, उदयनराजे मित्र समूहाचे ॲड. विनीत पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि अनेक शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे सातारा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करत स्वराज्याच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला.