भयावह! अवघ्या पाच वर्षांच्या चिरमुडीचा गळा आवळून खून

by Team Satara Today | published on : 11 April 2025


कराड : वाठार, (ता. कराड) येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. संबंधित मुलीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. रात्रभर ड्रोनच्या साह्याने शोधमोहीम राबविल्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी एका सोळा वर्षीय मुलीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संस्कृती रामचंद्र जाधव असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांकडून तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वाठार येथील संस्कृती जाधव ही पाच वर्षीय मुलगी गुरुवारी सायंकाळी घरानजीकच्या अंगणात खेळत होती. तेथून अचानक ती बेपत्ता झाली. रात्री मुलगी घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी गावात शोध सुरू केला. तेव्हा ती सापडली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी गावात दाखल झाले. त्यांनी गावासह परिसरातील शिवार पिंजून काढला. तसेच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या आसपासही मुलीचा शोध घेण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मुलीची माहिती सर्वत्र पाठविण्यात आली.

याचदरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस दलाच्या विविध शाखांकडून बेपत्ता मुलीच्या शोधासाठी रात्रभर सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. ड्रोनच्या माध्यमातून रात्री गावाच्या शिवारात शोध मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शेतात चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

या गुन्ह्यात पोलिसांनी प्रथमदर्शनी चौकशी केली असता एका सोळा वर्षीय मुलीचा सहभाग समोर आला आहे. तिला पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. तसेच गावातील आणखी एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कसून तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जाचहाट प्रकरणी पतीसह नणंदेवर गुन्हा
पुढील बातमी
महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2025 ची विविध विभागांनी समन्वयातून तयारी करावी : जिल्हाधिकारी

संबंधित बातम्या